मुंबई, 3 मार्च (हिं.स.) : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी शोक प्रस्ताव मांडला. दिवंगत सदस्यांना सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली.
माजी प्रधानमंत्री दिवंगत डॉ. मनमोहन गुरमुख सिंग, माजी विधानसभा सदस्य प्रदीप हेमसिंग जाधव-नाईक, मुकुंदराव गोविंदराव मानकर, उपेंद्र मंगलदास शेंडे व तुकाराम हरिभाऊ बिरकड यांच्या निधनाबद्दल विधानसभेचे अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी विधानससभेत शोकप्रस्ताव मांडून त्यांच्या कार्याचा गौरव केला.
डॉ. मनमोहन सिंग अर्थशास्त्राचे प्रख्यात प्राध्यापक होते. पंजाब विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे त्यांनी अध्यापन केले होते. त्यांनी केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार, नियोजन आयोगाचे सदस्य सचिव, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशी अनेक महत्त्वाची पदे भूषवली.
आर्थिक उदारीकरणाचे शिल्पकार :- १९९१ मध्ये अर्थमंत्री म्हणून त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत मूलगामी सुधारणा घडवून आणल्या. त्यांनी आर्थिक उदारीकरणाच्या युगाची सुरुवात केली आणि परकीय गुंतवणुकीला चालना दिली. त्यांच्या धोरणांमुळे व्यवसाय आणि उद्योगांना नवीन दिशा मिळाली आणि देशाला जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्याचे कार्य त्यांनी केले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (NREGA), माहितीचा अधिकार (RTI) कायदा, शिक्षणाचा अधिकार (RTE) कायदा,अन्नसुरक्षा कायदा, भूसंपादन कायदा अमलात आणला. डॉ. मनमोहन सिंग यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. असे गौरवोद्गार अध्यक्ष नार्वेकर यांनी काढले.
दिवंगत सदस्यांच्या कार्याला अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी उजाळा दिला. सभागृहात दोन मिनिटे मौन बाळगून दिवंगत सदस्यांना सर्व उपस्थित सदस्यांनी श्रद्धांजली वाहिली.