मुंबई, १० जून, (हिं.स.) : मुंबईतील नामवंत सर जे.जे. रुग्णालयातील वसतिगृहात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवारी रात्री उघडकीस आली. रोहन रामफेर प्रजापती असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता.
रोहन हा अपना बॉईज वसतिगृहाच्या खोली क्रमांक १९८ मध्ये राहत होता. रविवारी रात्री ११ च्या सुमारास त्याने खोलीत पंख्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्राथमिक तपासात आर्थिक अडचणी आणि अभ्यासाचा तणाव हे आत्महत्येमागील कारण असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
घटनेच्या वेळी वसतिगृहात सुट्यांमुळे फारसे विद्यार्थी उपस्थित नव्हते. रोहनने आत्महत्या करण्याआधी आपल्या एका मित्राला फोन करून खोलीत कोणी आहे का याची विचारणा केली होती. काही वेळाने त्याचे मित्र त्याच्या खोलीजवळ आले असता दरवाजा बंद आढळून आला. खिडकीतून पाहिल्यावर रोहनने गळफास घेतल्याचे दिसले. त्यांनी दरवाजा तोडून त्याला लगेचच आपत्कालीन विभागात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी सर जे.जे. मार्ग पोलिसांनी मृत्यूची नोंद केली असून विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले जात आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अंतर्गत नोंद करण्यात आली आहे.
रोहन हा अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी होता. नीट यूजी परीक्षा २०२० मध्ये त्याने भारतात ३१५५ वा क्रमांक मिळवला होता, अशी माहिती जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी दिली आहे.
—————