अमरावती, 9 ऑगस्ट –
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत अमरावती जिल्ह्यातील ६ लाख ९८ हजार ५३६ लाभार्थ्यांपैकी तब्बल २५ हजार ६७ महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या या योजनेत अर्जांची पुन्हा पडताळणी केल्यानंतर ही आकडेवारी समोर आली. आता सरकार या महिलांकडून आधी मिळालेली रक्कम परत घेणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महिला व बालविकास विभागाने इतर शासकीय विभागांकडून माहिती मागवून लाभार्थ्यांची ओळख पडताळली. यात अनेकांनी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेतल्याचे, एका कुटुंबात दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, वार्षिक उत्पन्न निकषापेक्षा जास्त असल्याचे, चारचाकी वाहन मालकी, नोकरीत असणे, अपूर्ण दस्तावेज किंवा खोटी माहिती देणे अशा बाबी आढळल्या. ५,९४२ महिलांकडे चारचाकी वाहन असल्याचेही प्रादेशिक परिवहन विभागाच्या माहितीवरून समोर आले, ज्यामुळे त्यांना लाभ थांबवण्यात आला.
२४४ महिलांनी स्वतःहून अर्ज मागे घेतला आहे. मात्र आधीच काही महिने हप्ता घेतल्यानंतर अपात्र ठरलेल्या महिलांकडून रक्कम वसूल केली जाणार का, हे स्पष्ट नाही. जर पैसे परत घेतले नाहीत, तर हा आर्थिक भार सर्वसामान्यांवर पडेल, असेही प्रश्न उपस्थित होत आहेत.
राज्य सरकारने निवडणूक काळात दरमहा २,१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु अद्याप बहिणींना १,५०० रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळालेली नाही, यामुळे नाराजी वाढली आहे.