अमरावती, 2 जून (हिं.स.)
सध्याघडीला राज्यात सर्व शासकीय, निम शासकीय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मौसम सुरू आहे. अशातच गृह विभागाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या २६ निरिक्षकांची इतर जिल्ह्यात बदली केली आहे. यामध्ये अमरावती शहरातील दोन निरिक्षकांचा समावेश आहे. तर, जिल्ह्यातील मोर्शी येथे मुंबईतील एका निरिक्षकाला पाठविण्यात आले आहे. या यादीमध्ये अमरावती रेंजमधील अकोला व बुलढाणा येथील दोन निरिक्षकांची बदली करण्यात आली आहे.
अमरावती शहरातील एक्साईज विभागाचे निरिक्षक अरिवंद ओमप्रकाश गभणे यांची गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे, सिध्दराम मक्कपा संकपाल यांची मुंबईत यु-विभागात बदली करण्यात आली आहे. परंतु, दोन्ही अधिकाऱ्यांच्या मोबदल्यात तुर्तास कोणत्याही निरिक्षकांना पाठविण्यात आले नाही. त्याचप्रमाणे मुबंई पी-विभागातील निरिक्षक सुभाष शिवाजी खरे यांची मोर्शी शहरात बदली करण्यात आली आहे. अमरावती -विभागातील अकोला येथील राजेश कृष्णा सपकाळ यांनी नंदुरबार येथे, बुलढाणा येथील निरिक्षक किशोर रेवा पाटील यांची नाशिमध्ये बदली करण्यात आली आहे. तर, चंद्रपुरचे ईश्वर नारायण वाघ यांना किशोर पाटील यांच्या जागी बुलढाण्यात पाठविण्यात आले आहे. लवकरच हे अधिकारी आपल्या बदलीच्या ठिकाणी रूजू होणार आहे.