सोलापूर, ५ ऑगस्ट – सोलापूर जिल्ह्यात ‘लम्पी’ आजाराचा प्रादुर्भाव वाढत असून आतापर्यंत १,५४४ जनावरे बाधित झाली आहेत. त्यातील १,१०८ जनावरांनी रोगावर मात केली आहे, तर ३३ जनावरांचा मृत्यू झाला आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांनी लम्पी संसर्ग झालेले क्षेत्र प्रतिबंधित म्हणून घोषित केले आहे. जनावरांच्या वाहतुकीवर कठोर निर्बंध लावण्यात आले असून लसीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे रोगाचा प्रसार रोखण्यास मदत होणार आहे.
पावसाळ्यात संसर्गाचा धोका वाढतो, त्यामुळे “माझा गोठा, स्वच्छ गोठा” अभियान हाती घेण्यात आले आहे. यामुळे गोठ्यांची स्वच्छता वाढून लम्पीसह इतर रोगांपासून संरक्षण मिळण्यास मदत होईल.
गायवर्गीय जनावरांमध्ये लम्पीचा धोका अधिक असल्याने त्यांना लसीकरण केले जात आहे. मात्र, अजूनही काही जनावरांचे लसीकरण बाकी असून पशुसंवर्धन विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. त्यामुळे लम्पीचा प्रसार अजूनही काही भागांत वाढत असल्याचे दिसून येत आहे.