पुणे, 29 मार्च (हिं.स.)।पुरंदर विमानतळासाठीच्या सात गावांमधील भूसंपादनासाठी संयुक्त मोजणी करावी लागणार असून, यासाठी सुमारे ४ कोटी ८६ लाख रुपयांचे शुल्क महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) भरावे लागणार आहे. या सर्व गावांतील ३ हजार २६५ सर्व्हे क्रमाकांमधील २६७३.९८२ हेक्टर क्षेत्र जमिनीची मोजणी करण्यात येणार आहे. पुरंदर तालुक्यातील वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव मेमाणे या सात गावांमध्ये एकूण ३ हजार २६५ सर्व्हे क्रमांक आहेत. त्यात २ हजार ६७३ हेक्टर ९८२ आर. इतकी जमीन आहे.
या जमिनीच्या मोजणीला लवकर सुरुवात होणार असून, यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने ‘एमआयडीसी’ला पैसे भरण्याची सूचना केली आहे. दरम्यान, जागेच्या मोजणीसाठी किती शुल्क भरावे लागेल, याबाबत एमआयडीसीने भूमी अभिलेख विभागाला विचारणा केली होती. त्यानुसार, भूमी अभिलेख विभागाच्या पुरंदर उपअधीक्षक कार्यालयांकडून एमआयडीसीला पत्र पाठविण्यात आले आहे. त्याद्वारे जमिनीचे संपादन करण्यापूर्वी मोजणी करण्यासाठी शुल्क भरण्याची सूचना केली आहे.