पालघर, 19 ऑगस्ट – मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्याने पालघर जिल्ह्यातील आंबेदे परिसरात मोठे नुकसान केले असून, स्थानिक पोल्ट्री व्यवसायिक निलेश पावडे यांच्या तब्बल ५ हजार कोंबड्या वाहून गेल्या आहेत. या घटनेत लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
सोमवार सायंकाळपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबेदे गावाजवळील ओढ्याला पूर आला. हे पाणी थेट पावडे यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये घुसले आणि काही तासांतच संपूर्ण शेड पाण्याखाली गेले. त्यामुळे कोंबड्यांना वाचवण्याची कोणतीही संधी उपलब्ध झाली नाही. याशिवाय पोल्ट्री फार्ममधील खाद्यसाठा व इतर साहित्याचेही नुकसान झाले आहे.
निलेश पावडे यांचा पोल्ट्री व्यवसाय हा त्यांच्या कुटुंबाचा मुख्य आधार आहे. नुकतेच त्यांनी व्यवसाय वाढवण्यासाठी जुलै महिन्यात नवीन कोंबड्यांचा लॉट आणला होता. मात्र, अतिवृष्टीमुळे आलेल्या या पुरात संपूर्ण कोंबड्या वाहून गेल्याने कुटुंबावर गंभीर आर्थिक संकट कोसळले आहे.
घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला देण्यात आली असून महसूल व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी पाहणी करत आहेत. ग्रामस्थांनी नुकसानग्रस्त कुटुंबाला तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे.
ही घटना मुसळधार पावसामुळे पशुपालक आणि पोल्ट्री व्यवसायिकांवर ओढवलेल्या संकटाचे ज्वलंत उदाहरण ठरली आहे. वेळेवर शासनस्तरावरून मदत न मिळाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे