नाशिक, 2 ऑगस्ट – वाढते प्रदूषण ही चिंतेची बाब असून, प्रत्येक श्वास हा मुलांच्या भविष्याशी जोडलेला आहे. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी पाण्याचे नियोजन, रेन हार्वेस्टिंगबरोबरच ग्रीनरी वाढवणे गरजेचे असल्याचे पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. सध्या महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या पाण्यापैकी केवळ ४८% पाण्यावर प्रक्रिया केली जाते, तर ५२% सांडपाणी थेट नद्यांमध्ये सोडले जात असल्याचे त्यांनी खंतपूर्वक सांगितले. आगामी काळात नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
क्रेडाई नाशिक मेट्रोच्या पुढाकाराने ‘एअरोनॉमिक्स २०२५’ मोहिमेचे उद्घाटन मुंडे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी आगामी कुंभमेळ्यासाठी पर्यावरण शुद्धतेचे महत्त्व अधोरेखित करत सर्वांना मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
मुंडे म्हणाल्या की, पुणे आणि मुंबईच्या तुलनेत नाशिकचे वाढीचे प्रमाण कमी आहे, तरीही प्रदूषणावर लाँग टर्म प्लॅनिंग आवश्यक आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नियम अधिक कडक करण्याचा प्रयत्न सुरू असून, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाशी संबंधित सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.
गोदावरी प्रदूषणमुक्त मोहिमेवर भर
आगामी कुंभमेळ्यासाठी गोदावरी प्रदूषणमुक्त करण्याचे काम स्वतः पाहणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले. नाशिकला वारंवार भेटी देण्याची तयारीही त्यांनी दर्शविली.
५० हजार झाडांची लागवड
क्रेडाई व श्रीजी ग्रुपतर्फे शहरात ५० हजार झाडे, तसेच दरी मातोरी येथे १५ ऑगस्टपासून ६४ हजार झाडे लावण्यात येणार असल्याचे जाहीर झाले. सिन्नर तालुक्यात ५० हजार झाडांची लागवड सुरू असून, २५ हजार झाडे आधीच लावली गेली आहेत.
कार्यक्रमादरम्यान मुंडे यांना कुंभमेळ्याच्या ब्रँड अॅम्बेसेडर व्हावे असा सल्ला देण्यात आला. त्यावर त्यांनी हसत, “राजकीय वस्त्र घालून ब्रँड अॅम्बेसेडर व्हायचे का?” असा सवाल करत वातावरण हलकेफुलके केले.