पंचकुला, 27 मे : कर्जाला कंटाळून एकाच कुटुंबातील 7 जणांनी विष प्राशन करून हरियाणाच्या पंचकुला येथे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मृतांमध्ये 2 पुरुष 2 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. हे सर्वजण उत्तराखंडच्या डेहराडून येथील रहिवासी होते.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास पंचकुला शहरातील सेक्टर-27 मधील घराबाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये काही लोक विष प्राशन करत असल्याची माहिती फोनवर मिळाली . पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कारमधील 6 जणांना सेक्टर-26 मधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान सर्वांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच डीसीपी हिमाद्री कौशिक आणि इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले. या गाडीच्या नंबरवरून डेहराडूनची असल्याचे सांगितले जात आहे.
मृतांपैकी दोघांची ओळख प्रवीण मित्तल आणि त्यांचे वडील देशराज मित्तल अशी आहे.प्रवीण मित्तल यांनी काही काळापूर्वी डेहराडूनमध्ये टूर अँड ट्रॅव्हल व्यवसाय सुरू केला होता, जो फारसा चालला नाही. त्यात त्याचे मोठे नुकसान झाले. यामुळे कुटुंब कर्जात बुडाले. परिस्थिती इतकी वाईट होती की कुटुंब जगूही शकले नाही. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.