सोलापूर, 10 जून (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यात गेल्या मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसाच्या जोरावर उजनी धरणातील एकूण पाणीसाठा ७८.५५ टीएमसीपर्यंत वधारला असून, यात उपयुक्त पाणीसाठा १४.८९ टीएमसी आहे. धरण २७.८० टक्के भरले आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांमध्येही अवघ्या १५ दिवसांत अडीच टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.
सोलापूर शहराला खेटून असलेल्या एकरूख प्रकल्प अर्थात हिप्परगा जलाशयात १.८८ टीएमसी झाला असून, त्याची टक्केवारी ८७.०३ एवढी मोठी आहे. त्यामुळे या जलाशयात पाणीसाठा आणखी वाढल्यास पाणी दोन्ही मुक्त सांडव्यातून सोडण्याची तयारी जलसंपदा विभागाने केली आहे. हे सोडलेले पाणी सोलापूर शहरातील पुणे नाका, बार्शी रस्त्यासह अवंती नगरी, वसंत विहार व अन्य नागरी वसाहतींमध्ये घुसण्याची शक्यता जलसंपदा विभागाकडून वर्तविण्यात आली असून, त्या अनुषंगाने सतर्कतेचा इशारा यापूर्वीच देण्यात आला आहे.