मुंबई, 20 ऑगस्ट – मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी (दि.१९) संध्याकाळी दोन मोनोरेल गाड्या एलिव्हेटेड ट्रॅकवर अडकल्या. अचानक झालेल्या गर्दीमुळे ट्रेनमध्ये विजेचा पुरवठा खंडित झाला आणि एअर कंडिशनर बंद पडल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. काही प्रवासी बेशुद्ध पडले, मात्र सर्व ७८२ प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली. यातील दोन प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
एमएमआरडीएच्या माहितीनुसार, लोकल सेवा विस्कळीत झाल्याने अनेक प्रवाशांनी मोनोरेलचा पर्याय निवडला होता. क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्याने विजेचा पुरवठा खंडित झाला. मयसूर कॉलनी आणि भक्ती पार्कदरम्यान अडकलेल्या एका मोनोरेलमधून ५८२ प्रवासी सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले, तर दुसऱ्या गाडीतून २०० हून अधिक प्रवाशांना वडाळा स्टेशनवर परत आणण्यात आले.
या गोंधळात १५ प्रवाशांनी दम लागण्याच्या तक्रारी केल्या. त्यापैकी १४ जणांना घटनास्थळीच उपचार देण्यात आले. तर २३ वर्षीय अमन सिंग आणि २७ वर्षीय ऐश्वर्या संदीप पवार यांना श्वास गुदमरल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर आश्वासन दिले की, सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले जाईल आणि घटनेची चौकशी केली जाईल. एमएमआरडीएचे संयुक्त आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी सांगितले की, पावसामुळे अनेक लोक स्टेशनांवर अडकले होते आणि त्यामुळे मोनोरेलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी चढले.
प्रवाशांनी सांगितले की, मोनोरेलमध्ये दीड तासाहून अधिक काळ वीज व एसी बंद होता. काहींनी श्वास घेण्यास त्रास झाल्याने खिडक्या फोडण्याचाही प्रयत्न केला. प्रवासी बेशुद्ध पडल्यामुळे परिस्थिती गंभीर झाली होती. मात्र तातडीच्या प्रयत्नांनंतर सर्वांची सुरक्षित सुटका करण्यात आली.
