अमरावती, ८ ऑगस्ट –
जून महिन्यात पश्चिम विदर्भात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे हजारो हेक्टर शेतीचे मोठे नुकसान झाले होते. पिके पाण्याखाली गेली, जमिनी खरडून गेल्या आणि आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. महसूल विभागाच्या सर्वेक्षणानंतर राज्य शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावास आता मंजुरी मिळाली असून, पाच जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त एक लाखावर शेतकऱ्यांना ८६.२३ कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात येणार आहे.
अतिवृष्टी, पूर आणि चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये शेतीपिकांचे नुकसान झाल्यास, पुढील हंगामासाठी मदत म्हणून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून निविष्ठा अनुदान दिले जाते. जून महिन्यातील नुकसानीसाठी अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मदत देण्याचा शासन निर्णय महसूल व वन विभागाने निर्गमित केला आहे.
अमरावती विभागातील एकूण ९७,७८५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, १,०७,४७२ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मदत वितरणासाठी ८६ कोटी २३ लाख ३८ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, सर्वाधिक निधी बुलढाणा जिल्ह्यास मिळणार आहे.
अमरावती जिल्ह्यात २,२४० शेतकऱ्यांचे १,३१२ हेक्टर शेती क्षेत्र बाधित झाले असून, त्यासाठी २ कोटी ७५ लाख ७९ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.