सोलापूर : दूध दरवाढीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राज्यभर विविध प्रकारे आंदोलन केले जात आहे. तुळजापुरात श्री तुळजाभवानी मंदिराच्या प्रवेशद्वारावरच दूध ओतून आंदोलन केले. तर पंढरपुरातही आंदोलन झाले. पंढरपूर अज्ञात एकाने रस्त्यावर टायर पेटविले. ग्रामदैवत तुंगेश्वराला दूधाचा अभिषेक केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून महाविकास आघाडीचा निषेध नोंदविला. सरकारला गायीच्या दुधाला प्रतिलिटर २५ दर व ५ प्रतिलिटर ५ अनुदान देण्याची सुबुध्दी देण्याची प्रार्थना केली. तुंगत गावांसह परिसरातील दुध बंद ठेवून उत्पादकांनी बंदमध्ये सहभाग घेतला. ग्रामदैवत श्री तुंगेश्वरालाही ही अभिषेक घालून साकडे घातले.
यावेळी स्वाभीमानीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, सरपंच आगतराव रणदिवे, औदुंबर गायकवाड, नवनाथ रणदिवे, विश्वनाथ गायकवाड, शिरीष रणदिवे, रामकृष्ण नागणे, आविराज रणदिवे, रमेश आद, गणेश रणदिवे, श्रीकांत आवताडे आदी उपस्थित होते. याशिवाय दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे येथे जनावरांना दुधाने अंघोळ घालून शासनाचा निषेध नोंदविला. दरम्यान, पंढरपूर अज्ञात एकाने रस्त्यावर टायर पेटविले.
* अंबाड येथे रस्त्यांवर ओतले दूध
दूध न घेण्याची विनंती केल्यानंतरही दूध खरेदी केल्याने नेचर डिलाईट डेअरीतील दूध रस्त्यांवर ओतून अंबाड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शासनाचा निषेध नोंदविला. सिध्देश्वर घुगे, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.
* रिधोरे येथे ग्रामदैवताला अभिषेक
पंढरपूर तालुक्यातील रिधोरे येथील ग्रामदैवत श्री रूद्रेश्वराला दुधाचा अभिषेक करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शासनाचा निषेध नोंदविला. दूध दरवाढ झालीच पाहिजे अशा घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महावीर सावळा, सिध्देश्वर घुगे, कार्याध्यक्ष शिवाजी पाटील, सत्यवान गायकवाड आदी उपस्थित होते.
* मेंढ्यांना दुधाची आंघोळ
माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. वेळापूर येथील ग्रामदैवताला दुधाने अभिषेक घालून उरलेल्या दुधाने शेळ्या-मेंढ्यांना आंघोळ घालण्यात आली़ यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अजित बोरकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
* निभोंरेत दूध ओतले
निभोंरे येथे दुधाचे दर वाढवावे अशा घोषणा करीत आज निंभोरे येथे दूध ओतून देण्यात आले. यावेळी सोशल डिस्टन्सचे पालन करून शांततेने कायदा सुव्यवस्थेला बाधा न लावता सर्व शेतकऱ्यांनी शांततेत शिस्तबद्ध आंदोलन केले यावेळी निंभोरे येथील सर्व दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.