श्रीपूर : माळशिरस तालुक्यातील अकलूज, महाळुंग व नातेपुते या तीन ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपरिषद व नगर पंचायतीमध्ये करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या जाहीर करण्यात आलेल्या पंचवार्षिक निवडणुका घेऊ नयेत, असे महाराष्ट्र शासनाने निवडणूक आयोगाला कळवले आहे.
राज्य शासनाचे उपसचिव एस. जे. मोघे यांनी १६ डिसेंबरला निवडणूक आयोगाला यासंदर्भात लेखी कळवले आहे. एप्रिल-मे २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने ११ डिसेंबर २०२० रोजी जाहीर केला आहे. यानुसार या ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे.
निवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींपैकी राज्यातील १६ ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपरिषद अथवा नगरपंचायतीमध्ये करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींची निवडणूक पुढील ३ महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात यावी, असे राज्य शासनाकडून निवडणूक आयोगाला कळविण्यात आले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
निवडणुका पुढे ढकलण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील अकलूज, महाळुंग -श्रीपुर, नातेपुते आणि वैराग या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. अकलूज ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतरणाची प्राथमिक उद्घोषणा १९ सप्टेंबर २०१९ रोजी करण्यात आले असून आक्षेप मागवण्यात आले होते. हे प्रकरण अंतिम टप्प्यात आहे. वैराग ग्रामपंचायतीच्या बाबतीत जिल्हाधिकारी यांचा अहवाल प्राप्त झाला असून नगरपंचायतीचे निकष पूर्ण करत असल्याने रूपांतरणाची प्राथमिक उद्घोषणा काढण्याची कारवाई सुरू असल्याचे राज्य शासनाने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे.
अकलूज,महाळुंग – श्रीपुर व नातेपुते ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपरिषद व नगरपंचायती मध्ये करण्यासंदर्भात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे गत दोन वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. अकलुजची लोकसंख्या ४७ हजार असल्याने येथे २३ निर्वाचित नगरसेवक २ स्विकृत नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष असे पदाधिकारी असतील.
* सदस्यांवर गदा येण्याची शक्यता
महाळुंगची लोकसंख्या २१ हजार असल्याने येथे १७ निर्वाचित नगरसेवक २ स्विकृत नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष असेल, तर नातेपुते येथे १७ निर्वाचित नगरसेवक २ स्वीकृत नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष अशी स्थिती असेल. अकलूज येथे नगरपरिषद अस्तित्वात येणार असल्याने अकलूज येथील एक जिल्हा परिषद गट व त्या अंतर्गत येणारे दोन पंचायत समिती गण गोठले जातील. सध्या याठिकाणी शितलदेवी मोहिते-पाटील या जिल्हा परिषद सदस्य तर अॅड. हसीना शेख आणि हेमलता चांडोले या पंचायत समिती सदस्य आहेत. त्यांच्या पदावर गदा येण्याची शक्यता आहे.
* स्थानिक राजकारणाविषयी
महाळुंग जिल्हा परिषद गटात तांबवे, गणेशगाव , संगम , बाभूळगाव , बाभुळगाव , वाफेगाव , वाघोली , लवंग आणि मिरे ही गावे येत असल्याने येथील जिल्हा परिषद सदस्य अरुण तोडकर यांचे पद अबाधित राहील. महाळुंग गणात मिरे .या गावाचा समावेश असल्याने महाळुंगचे पंचायत समिती सदस्य अनिल जाधव यांना दिलासा मिळू शकतो. नातेपुते जिल्हा परिषद गटात लोणंद फोंडशिरस, बांगर्डे ,पिरळे आणि कळंबोली ही गावे येत असल्याने येथील जिल्हा परिषद सदस्य साक्षी सोरटे यांना आणि नातेपुते येथील पंचायत समिती गणात लोणंद या गावाचा समावेश होत असल्याने येथील सदस्य माऊली पाटील यांनाही दिलासा मिळू शकतो.