सोलापूर : माढा तालुक्यातील परिते येथे खून करून मृतदेह चारीत फेकून दिलेल्या तरुणाच्या खुनाचा छडा टेंभुर्णी पोलिसांनी लावला. प्रियकराच्या मदतीने आईनेच मुलाचा खून केल्याचे उघड झाले आहे. त्या जन्मदात्या आईस बेड्या ठोकून न्यायालयासमोर हजर केले असता तिची पोलीस कोठडीत रवानगी केलीय. या खुनाच्या घटनेने परितेवाडी,परिते परिसरात एकच खळबळ उडाली होती.
२४ डिसेंबर रोजी रात्री ११ ते २५ रोजी दुपारी ३.३० च्या दरम्यान परितेवाडी येथील सिद्धेश्वर सुभाष जाधव (वय २२) याचा खून करून प्रेत परितेवाडी हद्दीतील माळावर टाकले होते. पोलिसांसमोर आरोपी शोधण्याचे मोठे आव्हान होते. पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच मुलाच्या आईस ताब्यात घेऊन चौकशी चालू केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. मुक्ताबाई सुभाष जाधव (वय ४५, रा. परितेवाडी) असे अटक केलेल्या आईचे नाव असून, प्रियकर तात्यासाहेब महादेव कदम (रा. परितेवाडी) हा घटना घडल्यापासून फरार आहे.
मुक्ताबाई सुभाष जाधव (वय-४५ वर्ष)रा.परितेवाडी ता.माढा असे मुलाच्या खुनप्रकरणी अटक केलेल्या अभागी मातेचे नाव असून सिद्धेश्वर सुभाष जाधव (वय-२२ वर्ष ) रा.परितेवाडी असे या खून झालेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. तात्या कदम असे फरार झालेल्या दुसऱ्या आरोपीचे नाव आहे.
शुक्रवारी (ता. २५) दुपारी परितेवाडी शिवारात माळावर चारीत एका युवकाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केलेला व पुरावा नष्ट करण्यासाठी चारीत फेकून दिलेला मृतदेह महेश सुरेश शिंदे यास प्रथम दिसून आला होता. ही माहिती कळताच तिथे बघण्यास आलेल्या लोकांनी मृतदेह गावातील सिद्धेश्वर सुभाष जाधव याचाच असल्याचे ओळखले होते.
परितेवाडीचे पोलीस पाटील जिंदास बाळू हराळे (वय-३१) यांनी टेंभुर्णी पोलिसांना या खुनाची माहिती दिली. सपोनि अमित शितोळे यांनी भेट देऊन रीतसर पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदन करण्यासाठी टेंभूर्णी आरोग्य केंद्रात दाखल केला. रात्री उशिरा टेंभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल झाला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या घटनेतील आरोपी मुक्ताबाई जाधव व तात्या कदम हे शेतात जवळजवळ राहत होते. यामुळे पाच-सहा वर्षांपासून तात्या कदम याने त्यांच्यात अनैतिक संबंध सुरू झाल्यानंतर त्याची बायको-मुले यांना घरातून हाकलून दिले होते. मुक्ताबाई हिस घरात नेऊन ठेवले होते. दोन वर्षांपूर्वी मुक्ताबाईचा पती सुभाष जाधव हा अचानक गायब झाला. मुक्ताबाई हिची एक एकर जमीन कदम याने लिहून घेतली असून एक वर्षांपूर्वी मुक्ताबाई हीला रानात पत्र्याचे शेड मारून तेथे तिला ठेवले होते.
मुलगा सिद्धेश्वर हा या अनैतिक संबंधास विरोध करीत होता. तो या दोघांच्या संबंधात अडसर ठरू लागल्यानेच त्याचा काढला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असल्याची माहिती सपोनि शितोळे यांनी दिली आहे. खून झालेल्या ठिकाणास करमाळा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल हिरे यांनी भेट देऊन तापासा बाबत सूचना दिल्या. फरार आरोपी तात्या कदम याचा टेंभुर्णी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
* दुसऱ्या मुलानेच सांगितली आईच्या गैरकृत्याविषयी माहिती
सपोनि अमित शितोळे यांनी गुप्त महितीगाराकडून खुनाची माहिती घेतली तसेच मयताच्या लहान भाऊ बालाजी यांच्याकडून माहिती घेतली असता मुक्ताबाई हिचे शेजारील तात्या कदम याच्याबरोबर अनैतिक संबंध होते. यामुळे मयत सिद्धेश्वर हा विरोध करीत होता. तसेच तात्या कदम यास जमीन लिहून देण्यास ही सिद्धेश्वर याचा विरोध होता. यामुळे आई मुक्ताबाई हिनेच सिद्धेश्वर यास मारले असावे असा संशय व्यक्त केला. तो वरवडे परिसरात हॉटेलमध्ये काम करून तेथेच राहत होता. या अनुषंगाने पोलिसांनी मुक्ताबाई हिच्याकडे तपास केला असता व पोलिसी हिसका दाखविताच मुक्ताबाई हीने खुनाची कबुली दिली आहे.