सोलापूर : महानगर पालिकेत सत्ता असलेल्या भाजपच्या उपमहापौर राजेश काळेवर पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. उपमहापौर मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनाही फोन करून शिवीगाळ केली आणि उपायुक्त धनराज पांडे यांना ५ लाखाची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.
उपायुक्तांची नियुक्ती नियमबाह्य असून, ‘तुमची बदली थांबवायची असेल तर मला पाच लाख रुपये द्या. मी मागासवर्गीय समाजाचा असून तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करेन’ अशा पद्धतीची धमकी देत खंडणीची मागणी भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांनी केली असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तसेच नियमबाह्य पद्धतीने काम करण्यास सांगितले असताना ते काम न झाल्याने फोनवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली असा आरोप महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महारनगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर व उपायुक्तांना शिवीगाळ करून उपायुक्तांना 5 लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे उपमहापौर राजेश काळे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. राजेश काळे यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
या प्रकरणी महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यात म्हटले आहे की, एका सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
त्या परिसरात ई-टॉयलेट, कचरापेट्या व इतर साहित्यांची व्यवस्था करावी. यासाठी भाजपचे उपमहापौर राजेश काळे हे झोन अधिकार्यांना फोन करून शिवीगाळ करीत होते. प्रशासनाच्या मान्यतेशिवाय पालिकेची मालमत्ता कुठेही नियमबाह्य पध्दतीने नेता येणार नाही. तुम्ही शासकीय नियमानुसार यापूर्वीच पत्रव्यवहार करणे गरजेचे होते. असे अधिकार्यांकडून सांगण्यात आले. यावरून संतापलेल्या उपमहापौर राजेश काळे यांनी रविवारी उपआयुक्त धनराज पांडे, झोन अधिकारी नीलकंठ मठपती यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर काळे यांनी मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनाही फोन करून शिवीगाळ केली आणि उपायुक्त धनराज पांडे यांना ५ लाखाची खंडणी मागितली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या फिर्यादीवरून भारतीय जनता पक्षाचे उपमहापौर राजेश काळे यांच्याविरूध्द अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे, खंडणी मागणे, अन्वये भादंवि कलम 343, 385, 504, 506, 294 प्रमाणे सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपमहापौर राजेश काळे यांच्या तपासासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत, अशी माहिती या गुन्ह्याचा तपास करणारे पोलिस निरीक्षक संजय पाटील यांनी दिली.