श्रीपूर : महाळुंग ग्रामपंचायतीचे लवकरच महाळुंग नगरपंचायतीमध्ये रूपांतर व्हावे, यासाठी महाळुंग श्रीपूर ग्रामस्थांनी एकजूट दाखवून महाळुंग ग्रामपंचायतीसाठी एकही फॉर्म भरला नाही. या एकजुटीमुळे सर्व पॅनल प्रमुखांनी ग्रामस्थांचे आभार मानले.
महाळुंग यमाईदेवी मंदिर प्रांगणात आज गुरुवारी घेण्यात आलेल्या ग्रामस्थांच्या बैठकीमध्ये सर्व पॅनल प्रमुखांनी ग्रामस्थांचे आभार मानले. महाळुंग नगरपंचायतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्या काळातच महाळुंग ग्रामपंचायतीची निवडणूक मुदत संपल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक लागली, पण निवडणूक लढवली तर लवकरच महाळुंग ग्रामपंचायत बरखास्त होऊन महाळुंग नगरपंचायत निवडणूक जाहीर होणार. यात वेळ आणि पैसा वायफट जाणार याचा विचार करुन महाळुंग श्रीपुर मधील सर्व पॅनल प्रमुख आणि ग्रामस्थांनी महाळुंग ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला होता.
घेतलेल्या निर्णयाप्रमाणे निवडणुकीसाठी सर्वांनी एक जूट दाखवत एकही अर्ज भरला नाही.
आज झालेल्या बैठकीमध्ये सर्व पॅनलप्रमुख यांच्या वतीने सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन रामचंद्र सावंत पाटील यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानून महाळुंग नगरपंचायत होण्यासाठी काही अडचणी आल्यास सर्वांबरोबर घेऊन वेळप्रसंगी कोर्टात जाण्याची तयारी ग्रामस्थांनी दाखवली. यापुढेही एकजुटीने सर्वांनी मिळून महाळुंग गावाच्या विकासाची कामे करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी रावसाहब सावंत – पाटील यांनी यमाई देवी मंदिरासमोरील पडलेल्या बारव बाबतचा प्रश्न असाच सर्व ग्रामस्थांनी राजकीय पुढाऱ्यांनी एकत्रित आवाज उठवावा, वेळप्रसंगी आमदार, खासदार यांच्या घरासमोर आंदोलन करून या प्रश्नी आवाज उठवावा असे आवाहन केले. यावेळी सुरेश गुंड पाटील, मौला पठाण, जि. प. सदस्य अरुण तोडकर, रिपाईचे शामराव भोसले, पत्रकार महादेव जाधव, बीटी शिवशरण, दत्ता नाईकनवरे, वंचित बहुजन आघाडीचे कल्याण लांडगे, संभाजी जाधव, आदींनी विचार व्यक्त केले.
बैठकीला रामचंद्र सावंत पाटील ,सहकार महर्षी कारखान्याचे संचालक नानासाहेब मुंडफणे, पं. स. सदस्य अनिल जाधव, राहुल कुंडलिक रेडे पाटील, डॉ. हरिश्चंद्र सावंत पाटील, माजी पं. स. सदस्य दत्तात्रय मुंडफणे, रावसाहेब सावंत पाटील, जि. प. सदस्य अरुण तोडकर, दिलीप रेडे पाटील, संभाजी जाधव ,शरद मुंड फणे पाटील भीमराव रेडे पाटील, बंडू वाळेकर, शामराव भोसले, सुरेश गुंड पाटील, अरुण पवार , सोमनाथ मुंडफणे, महादेव चव्हाण,भाऊसाहेब कुलकर्णी, गोरख मोहिते,बी टी शिवशरण, बंडू काळे,दत्ताञेय जाधव, रमेश देवकर ,कल्याण लांडगे, विजय भोसले ,राजकुमार रेडे, मोहन भोसले, रामहरी नवगिरे, महाविर शहा, असिफ शेख यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.