भिवंडी : काल्हेर ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवार शिवसेना शाखाप्रमुख दीपक म्हात्रे यांच्यावर काल शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी रिव्हॉल्वरने तीन गोळ्या झाडून गोळीबार केला. या हल्ल्यातून दीपक म्हात्रे थोडक्यात बचावले आहेत.
भिवंडीतील काल्हेर येथील शिवसेना शाखाप्रमुख दीपक म्हात्रे यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आलाय. गोळीबार चुकवल्याने दीपक म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी थोडक्यात बचावल्याचे वृत्त आहे. हे सर्व सीसीटीव्हीत कैद झाले आहे. याप्रकरणी नारपोलीस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमधील राड्यांना सुरुवात झाली असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
निवडणूक जिंकण्यासाठी साम दाम दंड भेद या सर्व नीतींचा वापर केला जाण्याची होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, शिवसेना शाखाप्रमुखावर झालेल्या हल्ल्याने येथील निवडणुका वादग्रस्त ठरणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून या रणधुमाळीत सर्वच राजकीय पक्ष ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविण्यासाठी तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रात सर्वात प्रथम ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकविण्याचा मान मिळविलेल्या काल्हेर ग्रामपंचायतीवर कित्येक वर्षे शिवसेनेचे अधिराज्य होते. परंतु 2015 मधील सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने ही सत्ता खेचून घेतली. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांच्यात चुरशीची निवडणूक होणार आहे.