सोलापूर : भाजपाचे उपमहापौर राजेश काळे यांना अटक केली आहे. बेकायदा कामांसाठी पालिका आयुक्त पी शिवशंकर यांना शिवीगाळ आणि उपायुक्त धनराज पांडे यांना पाच लाखांची खंडणी मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तसेच अन्य एका अधिकाऱ्याला बेकायदा काम करण्यासाठी धमकावल्याचाही आरोप होता. अखेर एका आठवड्यानंतर राजेश काळे यांना पोलिसांनी अटक केली.
महापालिका आयुक्त धनराज पांडे यांना अर्वाच्च भाषे शिवीगाळ करुन खंडणी मागितल्याप्रकरणी महापालिकेचे उपमहापौर राजेश काळेवर सदर बझार पोलिसांत 29 डिसेंबरला गुन्हा दाखल झाला होता. अटकेच्या भीतीने काळे त्याच रात्री सोलापुरातून पसार झाला होता. मागील आठ दिवसांत काळे याने परभणी, पुणे आणि सातारा जिल्ह्यात वास्तव्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. खबऱ्या आणि सायबर क्राईमच्या मदतीने पोलिसांना काळेचा ठावठिकाणा लागला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज (मंगळवारी) सकाळी श्री रुपाभवानी मातेचे दर्शन घेऊन राजेश काळे हा लातूरकडे जात होता. त्यावेळी शहर पोलिस गुन्हे शाखेने पाठलाग करुन त्याला पकडले. तत्पूर्वी, एका विवाह समारंभाच्या कारणावरुन महापालिका उपायुक्तांना दूरध्वनीवरुन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करताना काळे याने माजी मंत्र्यांचाही उल्लेख केला होता. मात्र, आपला राजेश काळे याच्याशी काहीच संबंध नसल्याचे संबंधित मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. मोठ्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करताना राजेश काळे याने त्यांना कॉल रेकॉर्डिंगला टाकण्यास सांगितले होते. त्यानंतर उपायुक्त पांडे यांनी सदर बझार पोलिस ठाणे गाठले आणि त्याच्याविरुध्द फिर्याद दिली होती.
ही कारवाई पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त बापू बांगर, डॉ. वैशाली कडूकर, सहायक आयुक्त अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सचिन बंडगर व संदीप शिंदे यांच्या पथकाने केली.
* कारवाईसाठी पक्षाकडे प्रस्ताव
भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांच्या वादग्रस्त शैलीमुळे आणि कामकाजामुळे पक्षासाठी कायम डोकेदुखी ठरले आहेत. पक्षातर्फे त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठविला आहे. दुसरीकडे आयुक्त पी. शिवशंकर यांनीही आक्रमक भूमिका घेऊन त्यांच्या अपात्रतेचा प्रस्ताव तयार केला आहे. चौहूबाजूंनी अडचणीत वाढ झाल्याने राजेश काळे हा सोलापुरातून पसार झाला होता.