सोलापूर : प्रेम संबंधातून १९ वर्षीय तरुण आणि त्याच्या अल्पवयीन प्रेयसीने एकाच स्कार्फने चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास बी.पी.एड. कॉलेज मोहोळ परिसरात उघडकीस आली. या दुर्दैवी घटनेमुळे मोहोळ शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे स्टेशन जवळील उजनी वसाहतीजवळील स्वत:च्या शेतात राहणाऱ्या भूषण (भैय्या) धनंजय पडवळकर (वय १९) व जवळच राहणाऱ्या १७ वर्षांची मुलगी या दोघांनी बुधवारी (ता. ६) दुपारी साडेबाराच्या दरम्यान चिंचेच्या झाडाच्या फांदीला एकाच स्कार्फने गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत पोलिस स्टेशनला खबर देताना मृत भूषण ऊर्फ भैय्या पडवळकर याचे चुलते संजय विलास पडवळकर यांनी माहिती दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नागनाथ गल्ली मोहोळ येथील भूषण धनंजय पडवळकर आणि स्टेशन रोड येथील वैष्णवी नामदेव थोरे यांचे एकमेकांवर प्रेम होते. दोघांनीही प्रेमाच्या आणाभाका घेऊन लग्न करून सुखी संसाराची स्वप्ने पाहिली होती. मात्र दोघेही भिन्न जातीचे असल्याने दोघांच्याही घरचे आपल्या या नात्याला स्विकारणार नाहीत, असा त्यांचा समज झाला होता. यामुळेच गेल्या काही दिवसांपासून दोघेही मानसिक तणावात वावरत होते.
बुधवारी सकाळी सव्वा दहा वाजता कटींग करून येतो असे सांगून भूषण घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर त्याने आपली प्रेमिका वैष्णवीची भेट घेऊन सोलापूर – पुणे महामार्गाच्या लगत असणारे बी.पी.एड. कॉलेज गाठले. या ठिकाणी त्यांनी एकत्र जगता येत नसल्याने किमान एकत्र तर मरू, असे म्हणत चिंचेच्या झाडाला एकाच स्कार्फने गळफास घेऊन आपल्या प्रेमकहानीला पूर्णविराम दिला. दुपारी ३ वाजता ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली.
या प्रकरणी संजय विलास पडवळकर यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक माने हे करत आहेत.
* एकमेकांच्या हातात हात, विदारक दृश्य
घटनास्थळावरील दृश्य एवढे विदारक होते, की अगोदर झाडाच्या फांदीवर दोघांनी बसून स्कार्फने गळ्याला घट्ट गाठी मारल्या होत्या व अलगदपणे फांदीखाली घसरल्यानंतरही एकमेकांच्या हातात हात घालून चेहरा समोरासमोर राहील याची खबरदारी घेतली होती. या प्रेमी युगुलांनी आपल्या प्रेमाचा दुःखद अंतही प्रेमविरह सहन न करता केल्याचे पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली. अधिक तपास पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक माने करीत आहेत.