सिंधुदुर्ग : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय पाहता 2024 च्या निवडणुकीमध्ये भाजप 400 चा आकडा क्रॉस करणार. काँग्रेसला मात्र एका बसमध्ये बसवून नेता येईल येवढेच खासदार मिळणार” असा खळबळजनक दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सिंधुदुर्गमध्ये केला आहे. यावरुन त्यांना मोदी क्रेझवर आणखी खूप आत्मविश्वास असल्याचे दिसले.
चंद्रकांत पाटील हे कणकवलीमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या राजकीय मुद्द्यांना हात घालत काँग्रेसला धारेवर धरलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय पाहता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 400 पेक्षा जास्त मिळतील. भाजप 400 चा आकडा क्रॉस करेल. तर दुसरीकडे काँग्रेसला मात्र एका बसमध्ये बसवून नेता येतील इतकेच खासदार मिळतील,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच महाविकास आघाडीच्या अस्तित्वाबाबतही त्यांनी यावेळी भाष्य केले. राज्यात सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांना आपण किती दिवस सत्तेत राहू हे माहिती नसल्याचे म्हणत त्यांनी आघाडी सरकार जास्त काळ टिकणार नसल्याचे सूतोवाच केले.
यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांचे समर्थन केले. “संपूर्ण देशाने कृषी कायद्यांचे समर्थन केले आहे. हे कायदे सहा महिन्यांपूर्वी झाले. मात्र विरोधकांना आता जाग आली आहे. एका राज्यातली मूठभर लोकांच्या साथीने हे आंदोलन केले जात आहे,” असे विधान चंद्रकांत पाटलांनी केले. तसेच, संपूर्ण देश या कायद्याचं समर्थन करतो आहे, हे दाखवण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केला होता. झालेल्या विधान परिषदेच्या सहा जागांच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असून या प्रकरणी आपण निवडणूक आयोग आणि मुंबई हायकोर्टात धाव घेणार आहोत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.
या निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी मतदान पत्रिकेवर मतदान घेण्याऐवजी इलेक्ट्रॉनिक वोटिग मशिनवर हे मतदान घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली होती.