मुंबई : अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अमलीपदार्थ विरोधी पथकाने बुधवारी अटक केली. ड्रग्ज प्रकरणी मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवालावर कारवाई करण्यात आल्यानंतर नवाब मलिक यांचं नाव समोर आलं होतं. समीर खान यांना समन्स बजावत चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. चौकशीनंतर त्यांना अटक केली. समीर खान हे नवाब मलिक यांची मुलगी निलोफर यांचे पती आहेत.
दरम्यान जावयाला अटक झाल्यानंतर नवाब मलिक यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी म्हटलं आहे की, “कोणीही कायद्यापेक्षा मोठं नाही आणि कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाला ही गोष्ट लागू असावी. कायदा आपलं काम करेल आणि न्याय होईल. मी न्यायव्यवस्थेचा आदर करत असून त्यावर पूर्ण विश्वास आहे”.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
एनसीबीने वांद्रे येथून ब्रिटीश नागरिक करण सजनानी आणि बॉलीवूड अभिनेत्रीची पूर्व मॅनेजर राहिला फर्निचरवाला यांना गांजासह अटक केली होती. यावेळी करण सजनानी याच्याकडून मुच्छड पानवाल्याला गांजा पुरवला जात होता, अशी माहिती चौकशीत समोर आली. राहिला फर्निचरवालासुद्धा मदत करत होती असं एनसीबीचं म्हणणं आहे. यानंतर एनसीबीकडून सोमवारी मुच्छड पानवाल्याची चौकशी करण्यात आली आणि नंतर अटकेची कारवाई झाली.
तपासादरम्यान करण सजनानी आणि समीर खान यांच्यात गुगल पेच्या माध्यमातून २० हजारांचा व्यवहार झाला असल्याचं समोर आलं. ड्रग्जसाठी हा व्यवहार झाल्याचा एनसीबीला संशय आहे.
* राष्ट्रवादीची भूमिका
मला वाटतं नवाब मलिक यांच्याबाबत त्यांच्या जावयाने केलेली एखादी चूक असेल, केलीय की नाही ते माहिती नाही, ते चौकशीदरम्यान कळेल. पण त्यांच्या सासऱ्यावर परिणाम होण्याचं काही कारण नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे धनंजय मुंडेंच्या बाबतीत जो अर्ज त्या महिलेने केला आहे, त्याबाबत प्राथमिक माहिती घेऊन, आवश्यक त्या गोष्टी होतील. या दोन्ही प्रकरणात सरकार कोणताही हस्तक्षेप करत नाही, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.