सोलापूर : अक्कलकोट तालुक्यात आज होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील खैराट येथील शेतकरी ग्रामविकास आघाडीचे उमेदवार सायबण्णा धानप्पा बिराजदार (वय ५८) यांचे निधन झाले आहे. या अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. मतदानामुळे त्यांचा मृतदेह सोलापूर येथून गावी उशिराने आणण्याचे काम चालू होते.
खैराट येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभाग क्रमांक तीन येथे शेतकरी ग्रामविकास आघाडीकडून निवडणूक लढवीत असलेले सायबण्णा बिराजदार यांची प्रकृती काल (गुरुवारी) रात्री अचानक बिघडली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यामुळे त्यांना सोलापूर येथील एका खासगी रुग्णालय येथे दाखल केले होते. पण उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने आज (शुक्रवारी) मतदाना दिवशीच पहाटे चार वाजता त्यांचे निधन झाले. मागील काही दिवसांपासून विजयी होण्यासाठी सायबण्णा बिराजदार यांनी वार्डातील प्रत्येक घर पिंजून काढलं होतं.
काल दिवसभर ते आपल्या प्रचारात सक्रिय होते. आपल्या प्रभाग क्रमांक तीन येथील मतदारांच्या गाठीभेटी देखील त्यांनी घेतल्या होत्या. त्या वेळी त्यांची प्रकृती ठीकच होती, असे ग्रामस्थांनी सांगितले. हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने काल खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. तब्येत आणखी खालावल्याने मतदानाच्या दिवशीच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.