सोलापूर / पुणे : सोलापूर-पुणे महामार्गावर एका वाहनचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणारे वाहनांची धडक झाली. यातील एक वाहन दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचे होते. या घटनेत मांजरेकरांच्या गाडीचे नुकसान झाले, त्यामुळे मांजरेकरांसह त्यांच्या साथीदारांनी गाडीतून उतरून नुकसानभरपाईची मागणी करत टेंभुर्णीतील कैलास सातपुते या वाहनचालकाला मारहाण केली. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात मांजरेकरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
कैलास सातपुते यांच्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी रात्री कैलास सातपुते हे आपल्या चारचाकी गाडीतून पुण्याकडून टेंभुर्णीकडे येत होते. यवतच्या पुढे एक किलोमीटर अंतरावर ते आले असता एक महागडी चारचाकी गाडी सातपुते यांच्या गाडीला ओव्हरटेक करून पुढे आली. परंतु या गाडीच्या पुढे टमटम असल्याने चालकाने अचानक ‘ब्रेक’ दाबला आणि गाडी जागेवर थांबली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यामुळे या गाडीला पाठीमागून सातपुते यांची चारचाकी धडकली. दोन्ही गाड्या थांबल्यानंतर ‘त्या’ महागड्या गाडीतून अभिनेते महेश मांजरेकर आणि त्यांचे साथीदार खाली उतरले. यावेळी नुकसानभरपाईची मागणी करून ते सातपुते यांना मारहाण करू लागले.
संतापलेल्या मांजरेकर यांनी शिवीगाळ करून चापट मारली, असे तक्रारीत म्हटले आहे. मांजरेकरांच्या कारचे किरकोळ नुकसान झाले. हे लक्षात येताच मांजेरकर गाडीतून उतरले आणि सातपुते यांना शिवीगाळ केली. दारू पिऊन गाडी चालवतोस का, असं म्हणत त्यांनी सातपुते यांना चापट मारली, असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. अपघातानंतर तक्रारदार व मांजरेकर यांच्यात झालेल्या वादावादीचा व्हिडिओ देखील तक्रादार व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात भादविच्या कलम ३२३, ५०४ व ५०६ अन्वये अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारदार सातपुते हे सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील रहिवासी आहेत.