मुंबई : 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर गावाकडेही भाजपनं आपले पाय रोवले होते. पुढे 2019 मध्ये राज्यातील चित्र पालटलं. आता महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीनं भाजपला मोठा झटका दिला आहे. त्यानंतर पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काय होतं, हे पाहणं महत्वाचं आहे.
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत भाजपचा दारुण पराभव केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
खानापूरात शिवसेनेला नऊ पैकी सहा जागा मिळाल्या आहेत. तर उर्वरित 3 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. दरम्यान, खानापूरचा निकाल चंद्रकांत पाटील यांच्यासाठी खूप मोठा धक्का आहे.
मात्र, पाटील यांनी हा दावा सपशेल फेटाळून लावला आहे. एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नाही, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आहेत. आज सर्व ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार हे आज स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उमेदवारांसह नागरिकांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.