अहमदनगर : पाटोदा येथील नागरिकांनी २५ वर्षे ग्रामपंचायतमध्ये लोकशाही मार्गाने काम करण्याची संधी दिली. या वर्षी या रणांगणात उतरलो नाही. कुणाचा प्रचारही केला नाही. पण मिडीयाने पाटोदा ग्रामपंचायत निवडणूक भास्करराव पेरे पाटील यांचा पराभव झाला म्हणून चुकीचे रंग भरले, असे परखड मत पाटोदाचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी श्रीगोंदा येथे मंगळवारी व्यक्त केले.
भास्कर पेरे हे स्व. शिवाजीराव नागवडे जयंतीनिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आदर्शगाव पाटोदाचे प्रवर्तक आणि आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या मुलीचा यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झाला. याची मोठी चर्चा राज्यभर झाली. यासंबंधी पेरे-पाटील यांनी प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘आपण या निवडणुकीपासून पूर्णपणे अलिप्त होतो. आमच्या कुटुंबातील एकाही सदस्याने मतदानही केले नाही. त्यामुळे मुलीच्या पराभवाचे माध्यमांमधून जे चित्र मांडले जात आहे, ते चुकीचे आहे,’ असे पेरे पाटील यांनी म्हटले आहे आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भास्करराव पेरे पुढे म्हणाले, पाटोदा ग्रामपंचायतीच्या पाच निवडणुका लढविल्या. लोकशाही मार्गाने जनसेवेची संधी मिळाली. गाव व गावातील नागरिकांचे विचार बदलून टाकले याचा आनंद आहे. पाटोदा ग्रामपंचायत निवडणूक रणसंग्रामापासून दूर राहण्याचा मनापासून निर्णय घेतला. आठ जागा बिनविरोध झाल्या. तीन जागांसाठी निवडणूक झाली.
माझ्या मुलीने उमेदवारी अर्ज भरला. मी त्याचवेळी तिला सांगितले, ‘तु उमेदवारी अर्ज भरला आहे. मी या निवडणुकीत कुणाचाही प्रचार करणार नाही. मला सर्व उमेदवार सारखे आहेत.’ मी निवडणूक काळात बाहेर होतो. या निवडणुकीत आमच्या घरातील ११ जणांनी मतदानही केले नाही. मुलीचा १८ मतांनी पराभव झाला. पण मिडीयाने चुकीच्या पद्धतीने चित्र रंगविले याच्या मनात वेदना झाल्या. मिडीयाने ग्रांऊड रिपोर्टचा अभ्यास करणे आवश्यक होते, असेही पेरे म्हणाले.