नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजेच 30 जानेवारीबाबत केंद्र सरकारने एक आदेश जारी केला आहे. हा दिवस दरवेळीप्रमाणे हुतात्मा दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. तसंच सर्व राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांना आदेश दिले आहेत. यामध्ये स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांची आठवण म्हणून दोन मिनिटं मौन बाळगण्यास सांगितलं आहे. त्यासोबत कामकाज आणि इतर व्यवहारही दोन मिनिटांसाठी बंद राहतील.
हुतात्मा दिवसासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी करण्यात आला आहे. त्यात म्हटलं आहे की, 30 जानेवारीला यापुढे दरवर्षी 11 वाजता दोन मिनिटांसाठी मौन पाळण्यात यावं. यासोबतच पूर्ण देशभरात त्या दोन मिनिटांसाठी कोणतंही काम होणार नाही तसंच इतर गोष्टीही बंद राहतील.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
केंद्र सरकारच्या आदेशात म्हटलं आहे की, ज्या जागेवर सायरन असतील तिथं आठवण करून देण्यासाठी सायरन वाजवण्यात येईल. तर काही ठिकाणी आर्मी गन फायरिंग करून सांगण्यात येईल. 10 वाजून 59 मिनिटांनी अलर्ट करण्यात येईल. त्यानंतर दोन मिनिटं सगळ्यांनी मौन रहायचं आहे.
जिथं सिग्नल नसेल तिथं इतर सुविधांच्या माध्यमातून मेसेज पोहोचवण्यात येईल. तसंच पहिल्यांदा मौन असल्यामुळे काही कार्यालयात कामकाज सुरू राहिल. सध्या तरी सक्तीने हा आदेश अंमलात आणावा असं सांगण्यात आलं आहे.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही महिन्यांच्या आतच 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. सांयकाळच्या प्रार्थनेसाठी जात असलेल्या गांधीजींवर नथुराम गोडसेनं तीन गोळ्या झाडल्या होत्या.