सोलापूर : आषाढ महिन्यातला शेवटचा शुक्रवार, भीमा नदी काठावरील आंबे (ता.पंढरपूर ) गावात म्हसोबाची जत्रा, त्या म्हसोबाला कापलेला बोकडाच्या मटणावर ताव मारण्यासाठी मंगळवेढाच्या सबजेलमध्ये असलेला कैदी गुपचूप पोलीस बंदोबस्तात पोचला, पुढे झाले उलटेच. म्हसोबा प्रसन्न झाला की नाही माहित नाही. पण कोरोना कोपला. कारण तो कैदी कोरोना पॉझिटिव्ह आला आणि नातेवाइकांच्या पदरी कॉरंटाईनचा प्रसाद पडला. दुसरीकडे वरकमाईसाठी चटावलेल्या पोलिसांच्या मागे कारवाईचा ससेमिरा लागला.
झाले असे की आंबे (ता. पंढरपूर ) येथील तानाजी बलभीम भोसले याच्यावर मंगळवेढा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. याच गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली असून गेल्या काही महिन्यापासून त्याचा मुक्काम मंगळवेढ्यातील सबजेलमध्ये आहे. गेल्या शुक्रवारी ( ता. 17 जुलै) आषाढातील शेवटचा शुक्रवार होता. या दिवशी तानाजी भोसले याच्या घरी आंबे या गावामध्ये म्हसोबाला बोकड कापण्यात आला होता. बोकडाच्या मटणाचे जेवण करण्यासाठी मित्रमंडळी आणि नातेवाईकांना आमंत्रित करण्यात आले होते. सबजेलमध्ये गार्ड ड्युटीला असणाऱ्या पोलिसांशी संगनमत करून तानाजी भोसले यानेही बोकडाच्या मटणावर ताव मारण्यासाठी घरी जाण्याचा बेत आखला.
गार्ड ड्यूटीला असणारे पोलीस हवालदार माने आणि त्यांच्या एका सहकाऱ्याने तानाजी भोसले याला शुक्रवार, 17 जुलै रोजी दुपारी 12:30 वाजता उपचारासाठी दवाखान्यात जाण्याचे निमित्त करून सबजेलमधून बाहेर काढले. हवालदार माने यांनी स्वतःच्या खासगी चारचाकी गाडीत बसवले. तुरुंगातील कैद्याला घेउन हवालदार माने यांची गाडी दवाखान्याला जाण्याऐवजी थेट आंबे या गावी पोचली. त्याठिकाणी उपस्थित सर्व मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या पंक्तीला बसून कैदी तानाजी भोसले आणि हवालदार माने व त्यांचा एक सहकारी यांनी मिळून एकत्रितपणे बोकडाच्या मटणावर ताव मारला. खाणेपिणे भेटीगाठी झाल्यानंतर हवालदार माने यांची गाडी तानाजी भोसलेला घेऊन पुन्हा मंगळवेढाकडे रवाना झाली.
दुपारी 2 वाजून 24 मिनिटांनी हे त्रिकुट मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात पोहोचले. ठाणे हवालदार माने यांनी सबजेलमधील कैदी तानाजी भोसले यांच्या पोटात दुखत असल्याने त्याला उपचारासाठी घेऊन आल्याची नोंद केली. ( नोंद क्र. १५५४) इथेपर्यंत सर्व प्रकार बिनदिक्कत घडला. खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी तुरुंगातून स्वतःच्या घरी गेला आणि पोलिस बंदोबस्तात बोकडाच्या मटणावर यथेच्छ ताव मारला. याची कोणालाच खबर लागली नाही. पण पुढे जे घडले ते उलटेच.
सध्या सोलापूर जिल्ह्यात कोरोना महामारी कहर केला आहे. ही महामारी मंगळवेढ्यातील सब जेलमध्येसुद्धा पोचली आहे. या जेलमधील तब्बल 28 कैदी कोरोना बाधित झाले आहेत. या २८ कैद्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच सगळीकडे खळबळ माजली. या कोरोना बाधित कैद्यांमध्ये तानाजी भोसले याचाही समावेश असल्याचे कळताच त्याच्या आंबे या गावातील नातेवाईकांची घाबरगुंडी उडाली. त्याचवेळी तानाजी भोसले याच्या तुरुंगातून घरी जाण्याच्या पराक्रमाला वाचा फुटली. त्यादिवशी बोकडाच्या मटणावर ताव मारण्यासाठी आंबे या गावात हजर असलेल्या सर्व नातेवाईकांची बोबडी वळली आहे.
तानाजीमुळे आपल्यालाही कोरोनाची बाधा होईल. या भीतीने त्यांची तारांबळ उडाली आहे. त्या जेवणावळीला जवळपास 100 पेक्षा जास्त नातेवाईक व मित्रमंडळी मंडळींनी हजेरी लावली होती. ही सर्व मंडळी कैदी तानाजी भोसले यांच्या संपर्कात आली आहेत. त्यामुळे त्यांनी ज्या म्हसोबाचा प्रसाद म्हणून मटणावर ताव मारला तो मसोबा त्यांना प्रसन्न झाला की नाही हे त्यांनाही कळले नाही. मात्र हे मटण खाण्यासाठी गेल्यानंतर कोरोनाचा प्रसाद आपल्या पदरी पडेल की काय या भीतीने त्यांना सतावले आहे.
इकडे सब जेलमधील कैदी बोकडाचे मटण खाण्यासाठी त्याच्या घरी गेलाच कसा याचा शोध वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. बुधवारी दिवसभर मंगळवेढ्याचे पोलीस उपाधीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. चौकशीची कुणकुण लागताच मंगळवेढा पोलिस ठाण्यात ठाणे अंमलदार म्हणून ड्युटीवर असणारे हवालदार माने यांच्या छातीत अचानक दुखू लागले. म्हणून त्यांनी दुपारीच पोलीस ठाणे सोडून जाणे पसंत केले. दरम्यान मंगळवेढ्याचे पोलीस उपाधीक्षक पाटील यांच्याकडे या प्रकरणाची माहिती घेतली असता सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.