रांची : राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांची प्रकृती चिंतानजक आहे. त्यांची तब्येत आणखी ढासळू लागल्याने त्यांना दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) तातडीने हलवण्यात येणार आहे. लालूंचे पुत्र व आरजेडीचे नेते तेजस्वी यादव हे कुटुंबीयांसह रांचीत दाखल झाले आहेत.
लालू हे सध्या कारागृहात शिक्षा भोगत आहेत. मात्र, प्रकृती ढासळल्याने त्यांना रांचीतील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये (रीम्स) दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला आहे. लालूंना एम्समध्ये दाखल करण्यात येईल, असे रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीने म्हटले आहे. याचबरोबर त्यांना दिल्लीला हलवण्यासाठी कारागृह प्रशासन स्थानिक न्यायालयाची परवानगीही घेणार आहे.
लालूंची प्रकृती ढासळल्याने तेजस्वी यादव हे कुटुंबीयांना घेऊन रांचीत दाखल झाले आहेत. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची ते भेट घेणार आहेत. तेजस्वी यादव म्हणाले की, माझ्या वडिलांसाठी आम्हाला चांगले उपचार हवे आहेत. सर्व चाचण्यांचे अहवाल आल्यानंतर डॉक्टर त्यांच्या उपचाराबद्दल निर्णय घेतील. माझे वडील सिरीयस आहेत. मी मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्यावर चांगले उपचार व्हावेत, अशी विनंती करणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
माझ्या वडिलांची हृदय शस्त्रक्रिया झाली होती. त्यांची किडनी केवळ 25 टक्केच काम करीत आहे. याचबरोबर त्यांना न्यूमोनियाही झाला आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे, अशी माहिती तेजस्वी यादव यांनी दिली.
लालूंवर उपचार करणारे रीम्समधील डॉ. उमेश प्रसाद यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल नुकताच लेखी अहवाल दिला होता. या अहवालानुसार, लालूंची किडनी केवळ 25 टक्केच काम करीत आहे. त्यांची प्रकृती कोणत्याही क्षणी ढासळू शकते. किडनीची काम करण्याची क्षमता कधीही कमी होऊ शकते आणि ती नेमकी कधी कमी होईल, हे सांगता येणार नाही.
लालूंना मागील 20 वर्षांपासून मधुमेह आहे. हा आजार दिवसेंदिवस बळावत आहे. त्यांचे अवयव अतिशय वेगाने खराब होत आहेत. यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनत आहे. रीम्समधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना लालूंच्या प्रकृतीचा अहवाल सादर करण्यात आला आहे, असे अहवालात म्हटले होते.
चारा गैरव्यवहार प्रकरणी लालू हे शिक्षा भोगत आहेत. लालूंना 30 ऑगस्ट 2018 रोजी रीम्समध्ये दाखल करण्यात आले होते. चारा गैरव्यवहारप्रकरणी शिक्षा झाल्यानंतर ते बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृहात शरण आले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.