मुंबई : ‘पद्म’ पुरस्कारावरून आरोप-प्रत्यारोप होणे नवे नाही. यंदाचं वर्षही यास अपवाद नसून काँग्रेसनं केंद्रातील सत्ताधारी भाजपवर पहिला वार केला आहे. प्रसिद्ध उद्योजक रजनीकांत श्रॉफ यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल काँग्रेसनं आश्चर्य व्यक्त केलं आहे.
* कंपनीवर ४० शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आरोप
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या संदर्भात एप्रिल २०१९ चे आपले जुने ट्वीट शेअर केले आहेत. रजनीकांत श्रॉफ हे युनायटेड फॉस्फरस लिमिटेड (यूपीएल) या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. विदर्भातील ४० शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी यूपीएल ही कंपनी जबाबदार असल्याचा आरोप या कंपनीवर झाला होता. याच कंपनीच्या मुख्यालयात भाजपचे प्रचार साहित्य बेकायदेशीररित्या बनवण्यात आले होते, असा आरोपही कंपनीवर झाला होता. सचिन सावंत यांनी जुने ट्वीट शेअर करून याची आठवण करून दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* भाजपा नेत्यांची कंपनीशी भागिदारी
‘यूपीएल कंपनीला मुंबई महापालिकेनं देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं ४,५०० कोटींचं कंत्राट देण्यात आलं होतं. मात्र, भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर हे कंपनीचे पेमेंट थांबवण्यात आले होते. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी महापालिका आयुक्तांशी बोलून हे पेमेंट व्हावे, यासाठी प्रयत्न केले होते. सत्ताधारी भाजपनंही या प्रकरणात मध्यस्थी केली होती.
भाजपचे खासदार संजय काकडे हे देखील या प्रकल्पात भागीदार आहेत. इतकेच नव्हे, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे बंधू प्रदीप गोयल हे या कंपनीच्या संचालक मंडळामध्ये आहेत. यूपीएल कंपनीचे भाजपशी असलेले संबंध स्पष्ट करण्यासाठी हे पुरेसं आहे,’ असं सावंत यांनी त्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.