नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांनी दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराजवळ पोलिसांवर तलवारी उगारल्या. दिल्लीत घुसणाऱ्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांडया फोडल्या तसेच लाठी चार्ज केला. त्यानंतर काही आंदोलकांची पोलिसांबरोबर चकमक झाली. त्यावेळी काही आंदोलकांनी पोलिसांवर तलवारी उगारल्या.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या असून त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ६० दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेत. या शेतकऱ्यांत विशेषत: पंजाब आणि हरीयाणातल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. असं असलं तरी देशभरातील विविध शेतकरी संघटना आणि श्रमिक संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सरकार आणि आंदोलकांमध्ये अनेक चर्चाही झाल्या परंतु, या चर्चेत काही तोडगा निघू शकलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाकडून या कायद्यांना स्थगिती देतानाच पाच सदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली. या समितीत कृषी कायद्यांच्या समर्थकांचा सहभाग असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
दरम्यान, आज होणारा प्रजासत्ताकदिन वैशिष्टय़पूर्ण असणार आहे. आज राजपथावर हिंदुस्थानच्या लष्करी सामर्थ्याचे दर्शन अवघ्या जगाला झाले. जवानांच्या भव्य परेडनंतर लाखो शेतकऱ्यांची ट्रॅक्टर परेड दिल्लीत सुरू आहे, देशाच्या राजधानीत ‘जय जवान, जय किसान’चा नारा घुमत आहे. दिल्लीत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, अर्थसंकल्पाच्या दिवशी 1 फेब्रुवारीला संसदेवर मोर्चा काढण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान, सिंघू आणि टिकरी सीमेवर शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेडस् तोडले आहेत. शेतकरी आंदोलक दिल्लीत प्रवेश करत असताना पोलिसांकडून त्यांना रोखण्यात आलं. यावेळी पोलीस व शेतकरी यांच्यामध्ये शाब्दिक वाद देखील झाला. त्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. यावेळी काही आंदोलक शेतकऱ्यांनी तलवारी बाहेर काढल्या त्यामुळे सध्या दिल्ली येथे तणावाचे वातावरण आहे.
* ऐकण्यास तयार नसल्यामुळे अधिकाऱ्यांनी रस्त्यावरच मारली बैठक
कृषी कायद्याविरोधात प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांची ट्रॅक्टर परेड सुरु आहे. दिल्ली पोलिसांनी ट्रॅक्टर परेडला परवानगी दिली होती. परंतु, आंदोलक शेतकऱ्यांनी निश्चित वेळेच्या आणि ठरलेल्या मार्गांपेक्षा इतर ठिकाणांहून परेड नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, अनेक ठिकाणी आंदोलनाने हिंसक वळण घेतले. दिल्लीतील नागलोई येथे पोलिस अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते ऐकण्यास तयार नव्हते. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांनी एकत्र रस्त्यावरच बैठक मारली.