मुंबई : हिंदुस्थानचा 72 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या झोकात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या राजपथावर आयोजित पथसंचलनामध्ये विविध राज्यांची संस्कृती दाखवणारे चित्ररथ यंदा सहभागी झाले. यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते महाराष्ट्राच्या चित्ररथाने.
वारकरी संतपरंपरा दर्शविणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथाचे दिल्लीतील राजपथावरील पथसंचलनात दिमाखदार पथ संचलन केले. राजपथावर छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचा फिरता देखावा ‘याची देहा, याची डोळा’ पाहण्याचे भाग्य नागरिकांना लाभले. तसेच या चित्ररथात तुकारामांची गाथा, संत साहित्याची महती पाहायला मिळाली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अनेक वारकरीही या चित्ररथावर दिसले. तसेच संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत गोरोबा काका, संत जनाबाई यांचा देखावा चित्ररथावर साकरण्यात आले. महाराष्ट्राच्या या चित्ररथाने उपस्थितांची मनं जिंकली.
* महाराष्ट्राच्या चित्ररथांनी नेहमीच छाप पााडली
प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथांनी नेहमीच छाप पााडली आहे. 1980 मध्ये ‘शिवराज्याभिषेक’ या महाराष्ट्राच्या चित्ररथाने पहिला क्रमांक मिळवला होता. त्यानंतर 1983 मध्ये ‘बैलपोळ्या’चा चित्ररथ अव्वल आला होता.
1993, 1994 आणि 1995 अशी सलग 3 वर्षे महाराष्ट्राच्या चित्ररथांनी राजपथावरील संचलनात बाजी मारली होती. त्यानंतर 2015 मध्ये ‘पंढरीची वारी’ या महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला होता. तर 2018 मध्ये ‘शिवराज्याभिषेक’ सोहळ्याच्या चित्ररथाने बाजी मारली होती.