जळगाव : भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे यांच्या नावाखाली आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आली होती. या प्रकारावर बोलताना रक्षा खडसे यांनी म्हटलं की, कालच ही गोष्ट आपल्याला कळली होती. त्यावेळी आपण भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहिलं असता हे दिसून आलेलं नाही. त्यामुळे पक्षाकडून असं झालं असेल आपल्याला वाटत नाही. पक्षाच्या वेबसाईटचा स्क्रिनशॉट काढून त्याचा हा दुरुपयोग केला गेला असावा. या संदर्भात आपण पोलिसांना कळवले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्यातून सत्य काय ते बाहेर येईल.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मात्र हे कुणी केलं असेल मग ते सत्ताधारी असू देत अथवा विरोधक असू दे एखाद्या महिला लोकप्रतिनिधीची अशी बदनामी करणं योग्य नाही. झाल्या प्रकारानं मला दुःख झालं आहे. पक्ष देखील याचा खुलासा करेलच, असं खासदार रक्षा खडसे यांनी म्हटलं आहे.
माझं यासंदर्भात काल पोलीस अधीक्षकांसोबत बोलणं झालं आहे. ते देखील याप्रकरणी माहिती घेत आहेत. पण सध्या सोशल मीडियाचं जग एवढं मोठं झालेलं आहे, तंत्रज्ञान एवढं पुढे गेलं आहे. त्याचा वापर करुन एखादी खोटी गोष्टही खरी केली जाते. मला शंका आहे की, फोटोशॉप करुनच या गोष्टी करण्यात आल्या आहेत, असं त्या म्हणाल्या.
* गृहमंत्र्यांनी पोस्ट व्हायरल करायला नको होती
अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांनी संकेतस्थळावरील आक्षेपार्ह उल्लेखाची दखल घेतली, ही चांगली बाब आहे. परंतु, दुसरीकडे मला वाईट या गोष्टीचे वाटले की त्यांनी ‘ती’ आक्षेपार्ह पोस्ट शेअर करायला नको होती, अशा शब्दांत भाजप खासदार रक्षा खडसेंनी आपली नाराजी व्यक्त केली. जळगावमध्ये रक्षा खडसे पत्रकारांशी बोलत होत्या.भाजपच्या अधिकृत संकेतस्थळावर खासदार रक्षा खडसेंच्या बाबतीत आक्षेपार्ह उल्लेख केल्याच्या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. याप्रश्नी आता राजकीय वतावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
“याप्रकरणी मला एकच म्हणायचं आहे की, कोणीही ही गोष्ट केलेली असली तरी एका महिलेबाबत विरोधकांनी किंवा सत्ताधाऱ्यांनी अशा गोष्टीला सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्त व्हायरल करण्याची गरज नाही. कारण तुम्ही एका महिलेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात. एक लोकप्रतिनिधी म्हणून या गोष्टीची देशभरात चर्चा केली जात आहे. या गोष्टीचं मला दुःख झालेलं आहे,”
– रक्षा खडसे, खासदार