नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाला ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसाचारानंतर आंदोलक द्विधा मनस्थितीत होते. काही ठिकाणांवरून आंदोलकांना पोलिसांकडून उठवण्यात आलंय आणि आंदोलनस्थळ रिकामं करण्यात आलंय. मात्र शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणांवरून शेतकरी आंदोलक येथे अर्ध्या रात्रीपर्यंत दाखल होताना दिसले.
गाझियाबादमध्येही प्रशासनाकडून हा प्रयत्न करण्यात आला. परंतु, यामुळे निराश झालेल्या शेतकरी नेते राकेश टिकैत यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. टीव्हीवर टिकैत यांना अशा अवस्थेत पाहिल्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार केलाय. आंदोलनस्थळावरची कमी झालेली गर्दी पुन्हा एकदा वाढू लागली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
प्रशासनाच्या कडक धोरणानंतर सीएपीएफच्या तीन तुकड्या, पीएसीच्या सहा तुकड्या आणि एक हजार पोलीस कर्मचारी या भागात तैनात करण्यात आले होते. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत मात्र शेतकऱ्यांच्या मागण्यांवर अडून राहिले. ‘आयुष्य संपवेन पण आंदोलन संपवणार नाही’ असा पवित्राच त्यांनी घेतला. एका टीव्ही मुलाखतीत त्यांना आपले अश्रू रोखता आले नाहीत. त्यांचा रडण्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर काही वेळातच व्हायरल झाला. तो व्हिडिओ पाहून टिकैत यांना पाठिंबा देण्यासाठी उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांतील शेतकरी गाझीपूर सीमेवर दाखल होऊ लागले.
काही वेळापूर्वी आंदोलन संपणार? शेतकरी नेत्यांना अटक होणार? अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, शेतकर्यांची वाढती संख्या पाहता रात्रीच सुरक्षादलानं आंदोलनस्थळावरून काढता पाय घेतला. काही जवानांनी आपली शिफ्ट संपल्याचं कारण पुढे केलं. पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांनीही रात्रीच आंदोलनस्थळ सोडलं.