अहमदनगर : आमच्या समोर भाजपा, शिवसेना किंवा काँग्रेस असे कोणीही नाही. फक्त समाज आणि देश आहे. ज्या वेळी समाज आणि देशासाठी घातक कृत्य होत असते. त्यावेळी आम्ही आंदोलन करतो. तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला आणि तुम्ही त्यांना कसे पाठीशी घातले याचे सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत. ते सगळे डिटेल्स मी देईल, असा निर्वाणीचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शिवसेनेला दिला.
अण्णा हजारे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ३० जानेवारीपासून उपोषण करणार होते. ते उपोषण अण्णांनी मागे घेतल्यानंतर अण्णा भाजपाला पाठीशी घालत आहेत, असे सूचित करताना शिवसेनेने ‘सामना’मधून अण्णा यांची भूमिका नेमकी काय आहे? असा प्रश्न विचारला आहे.
यावर अण्णांनी, आजचा अग्रलेख लिहिण्याचे कारण काय सांगा? असा शिवसेनेला प्रश्न केला – भाजपा सत्तेवर आल्यानंतर माझे एकूण ६ आंदोलने झालीत, ते आपण विसरलात का? शिवसेनेला इशारा देताना अण्णा म्हणालेत, तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला आणि तुम्ही त्यांना कसे पाठीशी घातले याचे सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत. ते सगळे डिटेल्स मी देईल.
* काय झाले नेमके
अण्णा हजारे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन शिवसेनेने आजच्या सामनाच्या अग्रलेखात केले आहे. लोकशाही, शेतकऱ्यांचे आंदोलन, शेतकऱ्यांचा स्वाभिमान याबाबत अण्णांना भूमिका घ्यावीच लागेल. राळेगणात बसून भाजपच्या नेत्यांसोबत प्रस्ताव आणि चर्चेच्या फेऱ्या करून काय उपयोग? अण्णांनी आधी उपोषण जाहीर केले आणि आता केंद्र सरकारच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून ते स्थगित केले. हे सगळे ठीक आहे, पण शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त करणाऱ्या कृषी कायद्यांबाबत त्यांची भूमिका काय आहे? या कायद्यांविरोधात सिंघू बॉर्डरवर मरमिटण्यास तयार असलेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना अण्णांचा पाठिंबा आहे का?
हजारे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उपोषण करण्याचे जाहीर करुन ते मागे घेतल्यानंतर शिवसेनेने आपले मुखपत्र सामनामधून अण्णा यांची भूमिका नेमकी काय आहे?, असा खोचक सवाल केला. त्यानंतर अण्णा हजारे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. तसेच आजचा अग्रलेख लिहिण्याचं कारण काय सांगा?, मग मी सगळं काही बाहेर काढतो, असंही अण्णा हजारे म्हणाले आहेत.