मुंबई : नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीतून वाट काढण्यासाठी म्हणून एका कारमध्ये असणाऱ्या काही इसमांनी भर रस्त्यात बंदुकीचा धाक दाखवला. त्यांच्या कारवर शिवसेनेबाबतचा एक स्टीकर लावल्याचं दिसून आलं. ज्यानंतर ते शिवसैनिक असल्याच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. सदर प्रकरणाची माहिती मिळताच बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या त्या इसमांवर तातडीनं कारवाई करण्यात आली.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शेअर केला. ज्यानंतर व्हिडीओ अतिशय झपाट्यानं व्हायरल झाला. संबंधित यंत्रणांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीनं पावलं उचलत गुन्हा दाखल करण्यात आला. आर्म ऍक्ट 325 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून विकास गजानन कांबळे, विजय प्रकाश, सिताराम मिश्रा, राम मनोज यादव या मुंबईत राहणाऱ्या चौघांना खोपोली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सदर प्रकरणी तपास होऊन दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि सत्य उघड होईल अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तर, रिव्हॉल्वर दाखवणाऱ्यांपैकी कोणी शिवसैनिक नसून त्यांना ताब्यात घेण्यात आलं असल्याही माहिती गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.
कारमधून प्रवास करणारे पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांच्याकडे असणाऱ्या रिव्हॉल्वरपैकी एक बनावट असून, दुसऱ्या रिव्हॉल्वरबाबत चौकशी सुरु आहे. दरम्यान, सदर प्रकरणामध्ये राजकीय मंडळींनी चुकीच्या पद्धतीने आरोप केल्याचंही गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई म्हणाले.