बंगळुरु : महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावादावर बोलत असताना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव सोडा, पण मुंबई देखील कर्नाटकचाच भाग असल्याचे वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर आता कर्नाटक सरकारच्या आणखी एका मंत्र्यांने एक बेताल विधान केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे कर्नाटकचेच आहेत.
ते कन्नड भूमीतील आहेत, असा दावा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री गोविंद कार्जोळ यांनी केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इतिहास माहीत नाही. त्यांनी तो वाचलाही नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज कर्नाटकातले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज हे कर्नाटकातील गदग जिल्ह्यातील सोरटूर गावचे. त्यांचे मूळ पुरुष बेळीअप्पा आहेत, असा अजब दावा गोविंद कार्जोळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याशिवाय, गोविंद कार्जोळ यांनी असाही दावा केला आहे की, कर्नाटकात दुष्काळ पडल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज महाराष्ट्रात गेले. नंतरच्या पिढीतील शिवाजी महाराज आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे मूळचे कन्नड भूमीतील आहेत. तसेच, कर्नाटकात मराठी, कन्नड जनता प्रेमाने राहते. जात मराठा असली तरी ते कन्नडच आहेत. महाराष्ट्रात देखील कन्नड मराठी जनता प्रेमाने राहते, असे गोविंद कार्जोळ म्हणाले.
* मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करावे
गोविंद कार्जोळ यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरूनही हास्यास्पद विधान केले आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या सरकारला काँग्रेसचा पाठिंबा आहे. सध्या काँग्रेस अस्वस्थ आहे. काँग्रेस कधीही शिवसेनेचा पाठिंबा काढून घेऊ शकते. उद्धव ठाकरे यांना काँग्रेस पाठिंबा काढून घेण्याची सतत भीती वाटत असून त्यामुळेच ते महाराष्ट्र-कर्नाटक सीमेबाबत लक्ष विचलित करणारी विधाने करत आहेत, असे गोविंद कार्जोळ यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बेळगाव, कारवार आणि निपाणीसह वादग्रस्त सीमाभाग प्रकरण न्यायालयात प्रलंबित असेपर्यंत हा परिसर केंद्रशासित प्रदेश करावा, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी प्रतिक्रिया देताना थेट मुंबईवरच दावा केला.
मुंबई कर्नाटकात समाविष्ट व्हावी, असे कर्नाटकच्या मराठी भाषिक लोकांना वाटत आहे. या लोकांसोबतच मीसुद्धा मुंबई कर्नाटकात समाविष्ट करण्याची मागणी करतो. ही मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात यावे, अशी मी केंद्र सरकारला विनंती करतो, असे लक्ष्मण सवदी म्हणाले होते.