नवी दिल्ली : आयडीबीआय बँकेसोबतच अन्य दोन सरकारी बँकांचे खासगीकरण होणार असल्याची मोठी घोषणा निर्मला सीतारमण यांनी केलीय. तसेच एका विमा कंपनीचेही खासगीकरण केले जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिलीय.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केलाय. त्यावेळीच ही मोठी घोषणा करण्यात आलीय. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीसाठी केंद्र सरकारनं प्रोत्साहन योजना सुरू केली आहे. व्यवसाय करण्याच्या सोयीसाठी स्वतंत्र प्रशासकीय रचना करण्यात येईल. जेणेकरून कोणत्याही व्यावसायिकाला व्यवसायात कोणतीही अडचण येणार नाही. गुंतवणूकदारांसाठी एक नवीन तरतूद करण्यात आलीय. विमा क्षेत्रात एफडीआय 49 टक्क्यांवरून 74 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. 2022 आर्थिक वर्षासाठी 20 हजार कोटी सरकारी बँकांना देण्यात येणार असल्याचंही निर्मला सीतारमण यांनी सांगितलंय.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आर्थिक तूट कमी करण्यासाठी सरकारनं बँकांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठीच आयडीबीआय बँकेसह दोन बँकांना मोदी सरकार विकणार आहे. कोरोनामुळे महसूल घटलेला असून, खर्चसुद्धा दिवसागणिक वाढत चालला आहे. राज्यांनाही खासगी क्षेत्रातील कंपन्यांची निर्गुंतवणूक करता यावी, यासाठी केंद्रीय कोषातून एक प्रोत्साहनपूरक पॅकेज आणणार आहोत, असंही सांगितलंय.
एलआयसीचा लवकरच आयपीओ येणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामण यांनी केलीय. त्यामुळे एलआयसीचा आयपीओ पहिल्या सहामाहीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सरकारनं मूल्यांकनासाठी एका कंपनीचीही नेमणूक केली असून, शेअर बाजारातील हा सर्वात मोठा आयपीओ ठरण्याची शक्यता आहे.