सोलापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांची सांस्कृतिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची राज्यपाल नियुक्त आमदारपदी निवड करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा भरारी पथकाचे सदस्य प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांनी केली आहे.
राज्यपाल नियुक्त आमदारपदी राजकीय नेत्याचे व कार्यकर्त्याचे पुनर्वसन करण्याऐवजी वेगेवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीची निवड करावी. त्यांच्या बुद्धीचा फायदा सरकारला होईल. त्यासाठी मेघराज राजेभोसले हे पात्र उमेदवार आहेत, असा दावा नाट्यकलावंत तथा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ भरारी पथकाने केली आहे.
कलाप्रकारातील लावणी , वाद्यवृंद, लोककला , नाटक, दूरचित्रवाणी , चित्रपट यासगळ्या क्षेत्रात निर्माता राजेभोसले महाराष्ट्राला परिचित आहेत. सर्वसामान्य कलाकार ते नामवंत कलाकाराच्या अडीअडचणीला मेघराज राजेभोसले वेळेला धावून आले आहेत.
कलाक्षेत्रात गेल्या ३० वर्षापासून कार्य करत आहेत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष पदाची धुरा हाती घेतल्यापासून त्यांची ओळख निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत. कलाकाराच्या प्रश्नासाठी शासन दरबारी नेहमी ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतात. कलाकाराच्या अडचणी, निर्मात्याच्या अनुदानाचा प्रश्न आदी प्रश्नासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. यासाठी आमदारपदी मेघराज राजेभोसले यांची निवड व्हावी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री यांनी राज्यपाल यांच्याकडे शिफारस करावी, अशी मागणी नाट्यकलावंत तथा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ भरारी पथकाचे सदस्य प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांनी केली आहे .