नवी दिल्ली : केंद्र सरकार ज्याप्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय करतं आहे अशा परिस्थितीत बळीराजाला सध्या आधाराची गरज आहे. आज गाझीपूरला जाऊन मी शेतकऱ्यांशी आणि शेतकरी नेत्यांशी चर्चा करणार आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले होते.
मात्र, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह सर्वांना दिल्ली पोलिसांनी या सीमेवरच अडवले आहे. त्यामुळे आंदोलनस्थळी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. शेतकरी आंदोलनाला भेट देण्यासाठी निघालेल्या खासदारांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, केरळमधील अनेक खासदार आहेत. विविध राज्यातील दहा पक्षांचे खासदार यानिमित्ताने एकत्र आले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या सर्व खासदार मिळून पोलिसांशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. यासर्वांना पोलिसांनी तीन किमी आधीच रोखले आहे. पोलिसांची ही कृती म्हणजे देशाच्या लोकशाहीवर होत असलेला मोठा हल्ला असून त्यावर कोणी बोलत नाही असं पंजाबमधील एका खासदाराने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.
“शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही इथे गडबड करायला आलोय की काय अशा पद्धतीने प्रचंड मोठा पोलीस फौजफाटा आणि बॅरिकेट्स लावून आम्हाला रोखण्यात आलं आहे. अन्नदाता सुखी भवं, असे आपल्यावर संस्कार झालेले आहेत. मात्र, शेतकऱ्यांशी सरकार ज्या पद्धतीनं वागतंय हे अतिशय दुर्देवी आहे”
सुप्रिया सुळे – खासदार
* शेतकऱ्यांना रोखण्यासाठी लावलेले खिळे काढले, नेत्यांना रोखले
दिल्लीच्या सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सुरक्षा भिंती, तारेची कुंपणे, सिमेंट काँक्रीटची भिंत, काँक्रीटमध्ये रुतलेल्या मोठे खिळे लावण्यात आले होते. यामुळे मोदी सरकारवर सडकून टीका झाली. असे कृत्य करणाऱ्या पोलिसांना चीनच्या सीमेवर नेले पाहिजे, असाही घणाघात करण्यात आला. या टीकेनंतर आता ते खिळे काढण्यात आले आहेत. दरम्यान, शेतकरी आंदोलकांना भेटायला जाणाऱ्या नेत्यांना रोखण्यात आले आहे.