सोलापूर : जिल्ह्यातील सरपंचपदांची आरक्षण सोडत काढताना तहसीलदारांच्या नजरचुकीने तीन तालुक्यांतील 15 गावच्या सरपंचपदांचे आरक्षण चुकले आहे. याबाबतचा अहवाल संबंधित तहसीलदारांनी पाठवला असून, तो अहवाल शासनाकडे पाठवून मार्गदर्शन मागवण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
माढा तालुक्यातील परिते, लहु, तांबवे या ग्रामपंचायतींचे आरक्षण अनुसूचित जाती स्त्रीऐवजी अनुसूचित जाती अर्थात सर्वसाधारण असे वाचण्यात आले आहे. ग्रामपंचायत भोगेवाडी, जाखले, अरण व रिधोरे या ग्रामपंचायतींसाठी अनुसूचित जातीऐवजी अनुसूचित जाती स्त्री असे काढण्यात आले आहे. करमाळा तालुक्यातील कुंभेज, ग्रामपंचायतीचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, तर फिसरे ग्रामपंचायतीचे आरक्षण नामाप्र पडले आहे. त्यामुळे नजरचुकीने या गोष्टी वाचण्यात आल्या आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दोन्ही तहसीलदारांनी जिल्हाधिकार्यांना अहवाल पाठविला आहे. बार्शी तालुक्यातील कापसी, सुर्डी, तुळशीदासनगर, तांदूळवाडी, ममदापूर, घाणेगाव व हिंगणी या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण चुकीचे निघाले असून याठिकाणी सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे. घाणेगाव आणि हंगणी याठिकाणी नामाप्र महिला आरक्षण निघाले असून त्याठिकाणी दुरुस्ती करणे अपेक्षित असल्याचा अहवाल तहसीलदारांनी जिल्हाधिकार्यांकडे पाठविला असून त्यामध्ये दुरुस्ती करण्याचे आधिकार आता शासनाला असल्याने त्याचा सविस्तर अहवाल शासनाच्या ग्रामविकास विभागाला पाठविण्यात येणार असल्याचे महसूल विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. त्यानंतर याठिकाणी योग्य तो बदल करुन त्यांचे फेरआरक्षण घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
* या तालुक्यातील चुकले आरक्षण
सोलापूर जिल्ह्यातील 658 ग्रामपंचायतींची निवडणूक झाली असून, सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात आले. आरक्षण सोडत काढत असताना काही ठिकाणी पूर्वीचे आरक्षण गृहीत धरून पुन्हा तेच आरक्षण काढण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. यात माढा तालुक्यातील 6, बार्शी तालुक्यातील 7 आणि करमाळा तालुक्यातील 2 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.