नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनादिवशी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार दीप सिद्धू अद्यापही फरार आहे. आता या प्रकरणात धक्कादायक माहिती बाहेर आली आहे. त्याच्या फेसबुकवर जे व्हिडीओ शेअर केले जात आहेत ते परदेशातून होत आहेत अशी माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. दीप सिद्धू मैत्रिणीच्या मदतीने परदेशातून ‘व्हिडिओ पोस्ट’ करतोय.
पोलिसांनी दीप सिद्धूवर एक लाख रुपयांचा इनाम जाहीर केला आहे. दिल्ली हिंसाचारानंतर फिल्मी अंदाजात दीप सिद्धू फरार झाला होता. दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रॅन्चने त्याच्या तपासासाठी पंजाबमध्ये अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. तरीही दीप सिद्धू अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. तपास यंत्रणांना चकवा पोलिसांच्या तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
* तपास यंत्रणांना भरकटवण्याचा प्रयत्न
पोलिसांच्या मते, दीप सिद्धू त्याच्या फेसबुकवरुन जे काही व्हिडीओ अपलोड करतोय ते स्वत: करत नसून परदेशातून त्याची एक मैत्रीण करतेय. यामागे तपास यंत्रणांना भरकटवण्याचा प्रयत्न केला जातोय.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दीप सिद्धू आणि दिल्ली पोलिसांचा हा पाठलागीचा खेळ फिल्मी स्टाईलने सुरु आहे. पोलीस ज्या ठिकाणी पोहचतात त्या ठिकाणाहून दीप सिद्धू काही वेळेपूर्वीच पसार झालेला असतो. हे वारंवार घडताना दिसतंय. असं असलं तरी दीप सिद्धूला लवकरच पकडण्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे.
* दिल्ली पोलिसांचा गौप्यस्फोट
प्रजासत्ताक दिनी दिल्ली आणि लाल किल्ल्यावर झालेला गोंधळ आणि हिंसाचाराची स्क्रिप्ट आधीपासूनच तयार होती असा गौप्यस्फोट दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचकडून नियुक्त केलेल्या SIT चौकशीतून करण्यात आला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार काही उपद्रव करण्यासाठी काही खास समूहांना लाल किल्ला आणि आयटीओ वर एकत्रित येण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या समूहांचा उद्देश गर्दीत सहभागी होऊन उपद्रवाची सुरुवात करणे आणि आंदोलनकर्त्यांना गर्दीचा हिस्सा बनवून हिंसेत सहभागी करणे हा होता, अशी माहिती मिळाली आहे.