कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगाल दौऱ्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जीवर आज हल्लाबोल केला. ‘आपली लढाई तृणमूल काँग्रेसशी असली तरी डावे आणि काँग्रेस यांच्यापासून सावध राहिले पाहिजे. या सगळ्यांनी पडद्यामागे हातमिळवणी केली आहे. दिल्लीत या सगळ्यांच्या भेटीगाठी आणि चर्चा होतात. यापूर्वी केरळमध्ये 5 वर्षे जनतेची लूट करण्यासाठी काँग्रेस आणि डाव्या पक्षांची हातमिळवणी झाली होती’, अशी टीका मोदींनी केली.
तुम्ही ममता बॅनर्जी यांना विकासाविषयी प्रश्न विचारले किंवा त्यांच्यासमोर जय श्रीराम म्हटलं की, त्यांना लगेच राग येतो. मात्र, भारताला बदनाम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कारस्थानाबद्दल त्या चकार शब्द काढत नाहीत, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
ते रविवारी पश्चिम बंगालच्या हल्दिया येथील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसवर बोचऱ्या शब्दांत टीका केली. ‘मा, माटी, मानुष’चा नारा देणाऱ्या पक्षामुळे शेतकरी दु:ख सोसत आहेत. पश्चिम बंगालच्या सरकार नाईलाजाने पंतप्रधान किसान योजनेत सहभागी झाले. मात्र, राज्य सरकारकडून केंद्राला शेतकऱ्यांची यादीच देण्यात आलेली नाही. त्यामुळे बंगालमधील शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान किसान योजनेचे पैसे जमा करता आलेले नाहीत, असे नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या छुप्या मित्रांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला. आपली लढाई तृणमूल काँग्रेसशी असली तरी डावे आणि काँग्रेस यांच्यापासून सावध राहिले पाहिजे. या सगळ्यांनी पडद्यामागे हातमिळवणी केली आहे. दिल्लीत या सगळ्यांच्या भेटीगाठी आणि चर्चा होतात. यापूर्वी केरळात पाच वर्षे जनतेची लूट करण्यासाठी काँग्रेस आणि डाव्या पक्षांची हातमिळवणी झाली होती, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.
स्वातंत्र्यपूर्व काळात पश्चिम बंगाल देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत आघाडीवर होता. त्याकाळी बंगालमध्ये उत्तम पायाभूत सुविधा होत्या. नोकरदरांना अनेक संधी उपलब्ध होत्या. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये बंगाल ही विकासाची गती कायम राखण्यात अपयशी ठरल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
* बंगाल तृणमूलला ‘राम कार्ड’ दाखवणार
पश्चिम बंगालमध्ये फुटबॉलचा खेळ विशेष लोकप्रिय आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसवर टीका करताना शाब्दिक कोटी केली. बंधू आणि भगिनींनो बंगाल फुटबॉलवर प्रेम करणारं राज्य आहे. त्यामुळेच मी फुटबॉलच्या भाषेत सांगू इच्छतो, तृणमूल काँग्रेसने एका पाठोपाठ एक असे कित्येक ‘फाउल’ केलेले आहेत. गैरप्रशासन, विरोधकांवर हल्ला व हिंसाचाराचा फाउल, बंगालच्या लोकांचा पैसा लुटण्याचा फाउल व श्रद्धेवर होत असलेल्या हल्ल्यांचा फाउल. बंगालची जनता सर्वकाही पाहत आहे. त्यामुळे आता लवकरच बंगाल तृणमूलला ‘राम कार्ड’ दाखवणार असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.