नवी दिल्ली : राज्यसभेतील शपथविधीवेळी छञपती शिवरायांचा जयजयकार करणाऱ्या उदयनराजे भोसलेंना समज दिल्याने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याविरोधात सर्वञ संताप, निषेध व्यक्त होत आहे. यावर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी ट्वीट करून आज स्पष्टिकरण दिले आहे.
राज्यसभेत झालेल्या नवनिर्वाचित सभासदाच्या शपथविधीवेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयजयकार केल्याने समज दिली होती. या प्रकारावरून शिवभक्तांमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते. तसेच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यावर टीका करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपतींनी आज या या घटनेबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी याबाबत ट्विट केले असून, त्यात ते म्हणाले की, शिवरायांबाबत मला आदर आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनुयायी आणि आई भवानीचा उपासक आहे. राज्यसभेमध्ये शपथविधीवेळी मी जी सूचना केली ती परंपरेला अनुसरून होती. शपथविधीवेळी कुठल्याही घोषणा देण्यात येत नाही. यामध्ये कुणाचाही अवमान करण्याची भावना नव्हती.’’
राज्यसभेमधील नवनिर्वाचित सभासदांचा शपथविधी काल राज्यसभेमध्ये झाला. यावेळी महाराष्ट्रातील नवनिर्वाचित राज्यसभा खासदार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आरपीआयचे रामदास आठवले, भाजपा नेते उदयनराजे भोसले, भागवत कराड, काँग्रेस नेते राजीव सातव आणि शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांनीही खासदारकीची शपथ घेतली.
राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. दरम्यान, भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी…जय शिवाजी’ असा जयघोष केला. मात्र त्यानंतर व्यंकय्या नायडू यांनी आपल्या चेंबरमध्ये अशा घोषणा देऊ नयेत, अशी समज दिली होती.