मुंबई : कोरोनाची स्थिती सावरत असतानाच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. आता कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाल्याने शाळाही सुरू झाल्या आहेत. त्यातच आता, कोरोनाची संभाव्य स्थिती विचारात घेऊन परीक्षांचे नियोजनही केले जात आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करणे परीक्षार्थी विद्यार्थ्यांना बंधनकारक असणार आहे.
दरवर्षीप्रमाणे परीक्षा घेण्यास काही हरकत नाही, असे पुणे बोर्डाचे मत आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेचे अर्ज भरून घेण्यात आले असून, दोन्ही वर्गातील सुमारे 32 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. मात्र, राज्यातील कोरोना अद्याप संपला नसल्याने एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांची परीक्षा पूर्वीप्रमाणे ठरलेल्या केंद्रांवर घेणे अशक्य मानले जात आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रे वाढतील, असा अंदाज आहे. तीन किलोमीटरच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्रे असणार आहेत.
* 25 टक्के अभ्यासक्रम वगळून प्रश्नपत्रिका
परीक्षांचे नियोजन करताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य दिले जाईल, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, परीक्षा केंद्रे वाढणार की नाहीत, पूर्वीच्याच परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे, याबद्दल या विभागाने काहीच घोषणा केलेली नाही. मात्र शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार 25 टक्के अभ्यासक्रम वगळून प्रश्नपत्रिका तयार केल्या जाणार आहेत. परीक्षेसह अन्य अडचणींसंदर्भात विद्यार्थी व पालकांचे समुपदेशन तथा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून कोरोनाची भीती दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.