नवी दिल्ली : “माता सीतेच्या नेपाळ आणि रावणाच्या श्रीलंकेत पेट्रोल स्वस्त आहे. तर मग आपलं सरकार प्रभू रामाच्या देशातही पेट्रोल, डिझेलचे दर कमी करणार का?,” असा प्रश्न विरोधकांनी संसदेत विचारला. यावर पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी उत्तर दिलंय.
इंधनाच्या वाढत्या दरांवरुन एकीकडे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असताना संसदेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. शेजारी देश नेपाळ आणि श्रीलंकेच्या तुलनेत आपल्याकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर जास्त का आहेत अशी विचारणा समाजवादी पक्षाचे खासदार विश्वंभर प्रसाद निषाद यांनी राज्यसभेत केली आहे.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी या प्रश्नाचं उत्तर देताना भारताच्या तुलनेत कमी लोकसंख्या असणाऱ्या देशांसोबत तुलना करणं अयोग्य असल्याचं म्हटलं. या देशांची लोकसंख्या कमी असल्याने इंधनाचा वापरदेखील कमी असल्याचं त्यांनी सांगितलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“आपण आपली तुलना मोठ्या अर्थव्यवस्थेशी करायची की छोट्या? या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या वस्तू महाग आहेत. या देशांमध्ये केरोसिनचा असणारा दर आणि आपल्या देशातील दर यामध्ये खूप तफावत आहे. बांगलादेश आणि नेपाळमध्ये केरोसिनचा दर प्रतीलिटर ५७ ते ५९ रुपये असून आपल्याकडे ३२ रुपये आहे,” अशी माहिती धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.
विरोधकांनी इंधनाच्या वाढत्या दराचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय किंमतीच्या यंत्रणेने नियंत्रित केले जात असल्याचं सांगितलं.
“गेल्या ३०० दिवसांमध्ये जवळपास ६० वेळा इंधनाच्या किंमतीत वाढ झाली आहे. आम्ही सात वेळा पेट्रोल आणि २१ वेळा डिझेलचा दर कमी केला आहे. तर २५० दिवस आम्ही दर वाढवला किंवा कमी केलेला नाही. त्यामुळे हा आरोप चुकीचा आहे,” असं त्यांनी सांगितलं.