नवी दिल्ली : कृषी कायद्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाण साधला आहे. शरद पवारांनी २००५ मध्ये एपीएमसी कायद्यात बदल करण्यासंबधी केलेलं वक्तव्य वाचून दाखवत नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर टीका केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी सभागृहात सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. शरद पवारांची भूमिका शंका निर्माण करणारी आहे. शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी शरद पवार अशी भाषा का करत आहेत? असा सवाल पंतप्रधान मोदींनी केला.
शेतकरी आणि कृषी क्षेत्राबाबत जे आता बोलत आहेत. त्यांना सर्व स्थितीची पूर्ण माहिती आहे. त्यांनी इतके वर्ष सरकार चालवले आहे. यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांची आणि प्रश्नांची जाण आहे. यासंदर्भात त्यांना काहीच माहिती नाही, असंही मला वाटत नाही. आता त्यांनीच सांगितलेल्या गोष्टींची आठवण करून देतो, असा टोला लगावत पंतप्रधान मोदींनी लोकसभेत माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जुन्या भाषणाचा उल्लेख केला. ते सभागृहात नाहीत. पण देशासाठी हे समजणं गरजेचं आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सरकारने २००५ मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात सुधारणा करण्यासाठी पावलं उचलली आहेत. यानुसार शेतकऱ्यांना आपला कृषी माल थेट विकता येईल, करार पद्धतीने शेती, खासगी बाजार व्यवस्था निर्माण करणं, शेतकरी ते ग्राहक बाजार आणि ई ट्रेडींगची सुविधाही असेल. या एपीएमसी कायद्यातील सुधारित तरतूदीची अंमलबजावणी करण्यासाठी २००७ मध्ये सूचित केले आहे. २४ खासगी बाजारपेठा आधीच तयार झाल्या आहेत. ही बाब गर्वाने कोण सांगत होतं? तर ते युपीएच्या काळात पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या सरकारमधील तत्कालीन कृषीमंत्री शरद पवार होते. हे त्यांचं म्हणणं आहे. आता ते एकदम उलट भाषा बोलत आहेत. यामुळे त्यांची भूमिका शंका निर्माण करणारी आहे. शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी शरद पवार अशी भाषा का करत आहेत? असा सवाल पंतप्रधान मोदींनी केला.
* शरद पवारांची बदलेली भाषा समजून घेतली पाहिजे
शरद पवारांना देशातील बाजार समित्यांमधील किंमतीसंदर्भातील रॅकेटबद्दल प्रश्न विचारला गेला, त्यावरही शरद पवारांनी उत्तर दिलंय. शेतकऱ्यांच्या हितासाठीच एपीएमसी सुधारणांना चालना दिली जात आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना बाजार समित्यांशिवाय वेगळा पर्याय उपलब्ध होईल. अधिक व्यापाऱ्यांची नोंद झाल्यावर स्पर्धा वाढेल आणि बाजार समित्यांधील किंमती ठरवणारे रॅकेट उद्ध्वस्थ होईल, असं उत्तर त्यावेळी शरद पवार यांनी दिलं होतं. यामुळे शरद पवारांची बदलेली भाषा ही आपण समजून घेतली पाहिजे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
ज्या राज्यांमध्ये विरोधकांचे सरकार आहे. त्यांनीही कमी जास्त प्रमाणात कृषी क्षेत्रात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे आमचे सरकार विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवतं. देशाची अधोगती करणारे राजकारण आम्हाला करायचे नाही, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्यांवर भोजपुरीतील एक म्हण सांगितली. काही लोक असे आहेत, ‘ना खेलब ना, खेल देब, खेल बे बिघाडत. म्हणजे ना खेळणार, ना खेळू देणार आणि खेळही बिघडवणार, असं म्हणत मोदींनी विरोधकांवर शरसंधान साधलं. यावळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या सभागृहात होत्या.