मुंबई : महाविकास आघाडी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सरकारी विमानानं प्रवास करायला परवानगी नाकारली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळं विमानात बसलेल्या राज्यपालांना विमानातून पुन्हा उतरावे लागले आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उत्तराखंडमध्ये झालेल्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी उत्तराखंडमध्ये निघाले होते. यावेळी ते सरकारी विमानानं प्रवास करणार होते. मात्र, राज्यपालांच्या विमान प्रवासाला ठाकरे सरकारनेच परवानगी नाकारल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळं आता राज्यपाल व त्यांच्यासोबत असलेले अधिकारी खासगी विमानानं देहरादूनला जाण्यासाठी निघाले आहेत. त्यानंतर ते उत्तराखंडला जाणार असल्याची, माहिती सूत्रांनी दिली आहे.
* राज्यपालांचा सन्मानच करतो – पालकमंत्री
राज्यपालांना कोणत्या कारणामुळं जाऊ दिलं नाही, त्याची माहिती घेण्यात येतंय. त्यांना परवानगी नाकारण्याचं काय कारण आहे त्याची माहितीही घेण्यात येईल. विमानात काही तांत्रिक अडथळा होता की?, एटीसीची प्रक्रिया पूर्ण झाली होती का?, या सगळ्यांची माहिती घेतली जाईल, असं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटलं आहे. तसंच, राज्यपालांचा आम्ही सन्मानच करतो, त्यांचा अवमान होणार नाही, असंही त्यांनी नमूद केलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* दोन महिने उलटूनही राज्यपाल निर्णय घेत नाहीत
गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत असल्याची चिन्हे आहेत. राज्यपाल कोट्यातून नियुक्त करावयाच्या विधान परिषदेतील १२ जागा सध्या रिक्त आहेत. राज्य मंत्रिमंडळानं या नावांची शिफारस राज्यपालांना केली आहे. राज्यपालांनी नावांवर फुली मारू नये म्हणून बऱ्याच विचाराअंती सरकारनं ही नावं पाठवल्याचं समजतं. मात्र, नावांची शिफारस करून दोन महिने उलटल्यानंतरही राज्यपालांनी त्यावर निर्णय घेतलेला नाही. त्यामुळं महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
* ‘राज्यपालांना विमानातून उतरवलं, जनता सरकारला सत्तेतून उतरवेल’
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ठाकरे सरकारने हवाई प्रवासास परवानगी नाकारल्याचे समोर आले आहे. यावरुन सरकारवर टीका होत आहे. राज्य सरकारकडून पोरखेळ सुरु असून, एवढं अहंकारी सरकार पाहिलं नसल्याची टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी केली. तसेच राज्यपालांना विमानातून उतरवण्यातं आलं, जनता सरकारला सत्तेतून उतरवेल, अशी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली.