नवी दिल्ली : केंद्र सरकारने ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्मात धर्मांतरण करणाऱ्या एससी प्रवर्गातील नागरिकांबाबत मोठी घोषणा केली. जो SC प्रवर्गातील व्यक्ती ख्रिश्चन किंवा मुस्लीम धर्म स्वीकारतील त्यांना कोणत्याही अनुसुचित जातीच्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, असे केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले. तसेच, या व्यक्तींना राखीव जागेवर निवडणूकही लढवता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्मात धर्मांतरण करणाऱ्या दलितांबाबत मोठी घोषणा केलीय. जे दलित ख्रिश्चन किंवा मुस्लीम धर्म स्वीकारतील त्यांना कोणत्याही अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, असं प्रसाद यांनी जाहीर केलंय. ते भाजप खासदार जीव्हीएल नरसिंह राव यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते.
रविशंकर प्रसाद म्हणाले, “ज्या दलित नागरिकाने ख्रिश्चन किंवा मुस्लीम धर्म स्वीकारला आहे, त्याला लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. त्यांना एससी आरक्षित जागेवरुन निवडणूक लढता येणार नाही. याशिवाय त्यांना एससी आरक्षणाचा इतर कोणताही लाभ घेता येणार नाही.”
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“संविधानाच्या परिच्छेद 3 मध्ये अनुसुचित जातींबाबत म्हटलं आहे की हिंदु, शीख किंवा बुद्ध धर्माव्यतिरिक्त कोणत्याही धर्मातील व्यक्तीला अनुसुचित जातीच्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. 1950 मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या सरकारने अनुसुचित जातींची व्याख्या स्पष्ट करताना केवळ हिंदु धर्मात आस्था असणारी व्यक्ती अशी केली होती. नंतर 1956 मध्ये या व्याख्याचे व्याप्ती वाढवून हिंदु, शिख आणि बुद्ध यांचाही समावेश करुन व्याप्ती वाढवण्यात आली,” असंही प्रसाद यांनी नमूद केलं.
काँग्रेस खासदार दिग्विजय सिंह यांनी मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मातील वंचितांना या आरक्षणाचा लाभ घेता येईल का असं विचारलं. यावर उत्तर देताना प्रसाद यांनी म्हटलं की कायद्यात कोणतीही अस्पष्ट तरतुद नाही. त्यात स्पष्टपणे म्हटलं आहे की केवळ हिंदु, शिख किंवा बुद्ध धर्मातील नागरिकांनाच या आरक्षणाचा लाभ घेता येईल.