सिंधुदुर्ग : खासदार विनायक राऊत व माजी खासदार निलेश राणे यांचा वाद चिघळला आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गच्या कणकवलीत दंगल काबू पथके तैनात करण्यात आली आहेत. गेले काही दिवस सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आजी-माजी खासदारांमध्ये वाक् युद्ध सुरु आहे. तसेच, यात शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते वादात ओढले गेले आहेत. हा वाद विकोपाला जाऊन अघटीत कृत्य घडू नये, यासाठी कणकवलीत दोन दंगलकाबू पथके तैनात करण्यात आली आहेत.
भाजप नेते निलेश राणेंनी खासदार विनायक राऊत यांना धमकी दिल्यापासून सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. राणेंच्या धमकीनंतर शिवसैनिक थेट रस्त्यावर उतरले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, सतीश सावंत, संदेश पारकर आणि जिल्हाभरातील कार्यकर्ते एकवटले असून, निलेश राणेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला. निलेश राणेंवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे निवेदनाद्वारे केली.
विनायक राऊत ही खासदार पदाच्या लायकीची व्यक्ती नाही. संसदेत काय बोलायचे हेदेखील त्यांना कळत नाही. केवळ लाट होती म्हणून ते कोकणातून निवडून आले. त्यांच्यात हिंमत असेल तर या क्षणाला खासदाराकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढवून दाखवावी. मग त्यांना किती मतं पडतात, हे पाहूच. विनायक राऊत यांच्यात तेवढी हिंमतही नाही. पण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही त्यांचा बंदोबस्त करून राऊतांना कोकणातून हद्दपार करू, अशी गर्जना निलेश राणे यांनी केली.
* नियोजन बैठकीतही खडाजंगी
काही दिवसांपूर्वीच जिल्हा नियोजन बैठकीत विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्यात खडाजंगी झाली होती. त्यानंतरही विनायक राऊत सातत्याने राणे यांच्या टीकेला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देत आहेत. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी विनायक राऊत यांना इशारा दिला. तुम्ही भाषा बदलली नाहीत तर जिथे दिसाल तिथे फटकावीन, असा इशाराही निलेश राणे यांनी दिला. दरम्यान निलेश राणेंच्या अशा सततच्या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली तर निलेश राणे जबाबदार राहणार असल्याचेही या नेत्यांनी म्हटले .